दोन कोटींची लाच मागणारा पीएसआय बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 19:33 IST2025-12-07T19:33:31+5:302025-12-07T19:33:56+5:30
- उपनिरीक्षक चिंतामणी याला ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले होते.

दोन कोटींची लाच मागणारा पीएसआय बडतर्फ
पिंपरी : दोन कोटींच्या लाचेची मागणी करून ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेला पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला तडकाफडकी शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश जारी केले.
प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ३५, रा. भोसरी) असे बडतर्फ केलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याची जानेवारी २०२५ मध्ये पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेत नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडे चार कोटींच्या फसवणुकीचा एक गुन्हा तपासासाठी आहे. त्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याने संशयित आरोपीला मदत करण्यासाठी संशयित आरोपीच्या वकिलाकडे दोन कोटींची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुणे येथील रास्तापेठ येथे २ नोव्हेंबर २०२५ रोजी कारवाई केली. त्यावेळी उपनिरीक्षक चिंतामणी याला ४६ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले होते. तसेच त्याच्या घरातून ५१ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. त्यानंतर चिंतामणी याला निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, गुंतवणूक केल्यास रक्कम २० महिन्यांत दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवत उपनिरीक्षक चिंतामणी याने अनेक नागरिकांची पाच कोटींपर्यंत फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी २५ नोव्हेंबर रोजी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक चिंतामणी याच्या विरुद्धच्या गंभीर स्वरुपाच्या कसुरीच्या अनुषंगाने चिंतामणी याला शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले.