पिंपरी : पंचवीसवर्षीय तरुण बेपत्ता झाल्याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्याचा शोध न लागल्याने बेपत्ता तरुणाच्या पत्नीने पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली. तिचे आंतरधर्मीय लग्न झाल्याचे चौकशीतून समजले. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता अंगावर काटा आणणारा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार समोर आला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी खून प्रकरणाचा उलगडा केला.अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील एकचे त्याच्या शेजारच्या मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांनी पळून जाऊन आंतरधर्मीय लग्न केले. त्यानंतर ते एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशीत वास्तव्यास आले. तरुण खासगी वाहनावर चालक होता. दरम्यान, १५ जून २०२४ रोजी तो बेपत्ता झाल्याची नोंद एमआयडीसी भोसरी पोलिसांत करण्यात आली.
पतीचा शोध लागत नाही म्हणून पत्नीने पुन्हा पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जामदार यांनी चौकशी केली. तिचा आंतरधर्मीय लग्न असल्याचे समोर आले. त्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याचे जामदार यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार यांना माहिती दिली. पथकाने बेपत्ता तरुणाच्या मोबाइल फोनचे तांत्रिक विश्लेषण केले. तरुणीच्या माहेरची माहिती घेतली. त्यावेळी तिच्या भावाच्या मोबाइलचे लोकेशन चाकण परिसरातील आढळून आले. त्यामुळे तिच्या भावाला आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
मृतदेह जाळून नद्यांमध्ये टाकले अवशेषबहिणीने चार महिन्यांपूर्वी आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग संशयिताच्या मनात होता. त्यातून त्यांनी तरुणाला दारू पिण्यासाठी बोलावून अपहरण केले. त्यानंतर गळा आवळून खून केला आणि मृतदेह आळंदी-चाकण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी जाळला. राख आणि मृतदेहाचे अवशेष पोत्यात भरून पुरावा नष्ट करण्यासाठी नद्यांमध्ये टाकले.
यांनी केला तपासपोलिस उपायुक्त डाॅ. शिवाजी पवार, सहायक आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र पानसरे, अंमलदार चंद्रकांत गवारी, प्रवीण मुळूक, नितीन खेसे, विशाल काळे, आनंद जाधव, अक्षय क्षीरसागर यांच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यात जाऊन संशयितांना ताब्यात घेतले.
हाडांची ‘डीएनए’ अन् डायरीतील मोबाइल क्रमांकघटनास्थळावरून जळालेल्या मृतदेहाचे अवशेष मिळाले. त्यातील हाडांची ‘डीएनए’ तपासणी केली असता ती संबंधित तरुणाचीच असल्याचे समोर आले. तेथे तरुणाचे अर्धवट जळालेले पाकीट मिळाले. त्यातील डायरीत काही तरुणींचे मोबाइल क्रमांक मिळाले. खून झालेला तरुण आणि आमच्या मैत्रिणीचे प्रेमसंबंध होते. तिच्याशी बोलण्यासाठी तो मोबाइलवर फोन करायचा, असे संबंधित तरुणींनी सांगितले. त्याच्या टपाल खात्याचाही क्रमांक मिळाला. ...अन् सलोखा संपुष्टातसंबंधित तरुण आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघांचे कुटुंब वीस वर्षांपासून शेजारी राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये सलोखा होता. मात्र, दोघांनी प्रेमविवाह केल्यामुळे दरी निर्माण झाली. त्यातूनच खुनाचे प्रकरण घडले. खून झालेल्या तरुणाचा मेहुणा आणि साडूसह तिघांना अटक केली.
तरुणीचे आंतरधर्मीय लग्न झाल्याचे समोर आल्यानंतर लागलीच तपासाची दिशा बदलली. सबळ पुरावे उपलब्ध झाले आणि संशयितांभोवती कायद्याचे पाश आवळले गेले. - गणेश जामदार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे