पिंपरी-चिंचवडला यंदा लेजरमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:43 IST2025-08-07T14:42:19+5:302025-08-07T14:43:03+5:30
- निगडी येथे श्री मोरया पुरस्कारांचे वितरण : फिरता करंडक थेरगाव येथील विशाल मित्र मंडळास प्रदान; ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांवर भर देण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवडला यंदा लेजरमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले
पिंपरी : मागील वर्षी गणेशोत्सवात लेजरचा वापर झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे काही लोकांना आयुष्यभराचे अंधत्व आले आहे. लेजरमुळे डोळ्यांना झालेली इजा कधीही भरून येत नाही. त्यामुळे लेजर वापरू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) केले.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्री मोरया पुरस्कार प्रदान सोहळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निगडी प्राधिकरणात झाली. यावेळी आयुक्त चौबे बोलत होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, विवेक पाटील, डॉ. शिवाजी पवार, संदीप आटोळे, विशाल गायकवाड उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दिला जाणारा फिरता मोरया करंडक थेरगाव येथील विशाल मित्र मंडळाने मिळवला.
चौबे म्हणाले की, गणेशोत्सव मंडळांना पोलिसांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मंडळांचे पदाधिकारी, मंडप मालक, मंडपाचा आकार याचीही माहिती द्यावी लागेल. धर्मादाय आयुक्तांचे नोंदणी प्रमाणपत्र, मागील वर्षीचे परवानगी पत्र, सार्वजनिक जागेवर असल्यास किंवा खासगी जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, वीज जोडणीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.
ते म्हणाले, मागील दोन वर्षांत पारंपरिक वाद्यांचा वापर वाढला असून डीजेचा वापर कमी झाला आहे. यंदाही डीजेचा वापर टाळा. लेजरमुळे काही लोकांना अंधत्व आले. त्यामुळे लेजर वापरू नये. मिरवणूक मार्गावर बेकायदेशीर पार्किंग होणार नाही, याची काळजी घेऊ.
पुढील वर्षीपासून नवीन दोन पुरस्कार
चांगल्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन वर्षांपासून मोरया पुरस्कारांची सुरुवात केली. आता १२ पुरस्कार दिले जात असून पुढील वर्षी आदर्श मिरवणूक आणि आदर्श देखावा असे दोन पुरस्कार वाढवले जाणार आहेत.
महापालिकेकडूनही उपाययोजना
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, अडथळा ठरणारे विजेचे खांब, वायर काढणे, रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. पीओपी मूर्ती लवकर विरघळण्यासाठी कृत्रिम हौदात विशिष्ट रसायन टाकून उपाययोजना करू.
श्री मोरया पुरस्कार
परिमंडळ एक
प्रथम - शरयू प्रतिष्ठान, प्राधिकरण निगडी
द्वितीय - एसकेएफ गणेश मंडळ, चिंचवड
तृतीय - मधुबन मित्र मंडळ, जुनी सांगवी
परिमंडळ दोन
प्रथम - सिद्धीचा गणपती महिला मंडळ, बावधन
द्वितीय - शिवछत्रपती तरुण मंडळ, देहूरोड
तृतीय - कोकणे चौक मित्र मंडळ, काळेवाडी
परिमंडळ तीन
प्रथम - मयूर मित्र मंडळ, चाकण
द्वितीय - नवयुग मित्र मंडळ, चाकण
तृतीय - दक्षता तरुण मंडळ, चिखली
पोलिस आयुक्तालय स्तरावरील पुरस्कार
प्रथम - विशाल मित्र मंडळ, थेरगाव
द्वितीय - शिवशंभो प्रतिष्ठान, मोशी
तृतीय - आझाद हिंद मंडळ, फुगेवाडी