हिंजवडीतील रस्ते नको रे बाबा..! आंतरराष्ट्रीय कंपन्याही नाराज;‘आयटी पार्क’ची प्रतिमा डागाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:02 IST2025-08-02T10:01:41+5:302025-08-02T10:02:26+5:30
रस्त्यांची दयनीय अवस्था, सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील अनेक आयटी आणि अन्य कंपन्यांची आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करताना दमछाक

हिंजवडीतील रस्ते नको रे बाबा..! आंतरराष्ट्रीय कंपन्याही नाराज;‘आयटी पार्क’ची प्रतिमा डागाळली
- गोविंद बर्गे
पिंपरी : आयटीनगरी हिंजवडी परिसरातील उद्योग सध्या अडचणीत आले आहेत. वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते यामुळे येथे येणारे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधीही त्रासलेले आहेत. येथील कंपन्यांना नवीन प्रकल्पाचे काम द्यावे का, याबाबत ते साशंकता व्यक्त करत आहेत. काही नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे प्रकल्पाचे काम देण्यास स्पष्ट शब्दांत नकार देण्यास सुरुवात केली आहे.
हिंजवडी आयटी पार्कची प्रतिमा अलीकडच्या काळात सुमार दर्जाच्या पायाभूत सुविधांमुळे डागाळू लागली आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, सकाळी आणि संध्याकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे परिसरातील अनेक आयटी आणि अन्य कंपन्यांची आंतरराष्ट्रीय प्रकल्प पूर्ण करताना दमछाक होत आहे. नवीन प्रकल्प मिळविताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आयटी कंपन्या या सेवा पुरवतात...
हिंजवडी येथील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान उद्योग मोठ्या संख्येने आहेत. या क्षेत्रात विविध सेवा पुरविल्या जात आहेत. डिजिटल सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सक्षम सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, इन्फ्रास्ट्रक्चर, इंजिनिअरिंग, हेल्थकेअर सोल्युशन्स, वाहन डिझाइन व इंजिनिअरिंग सेवा, तसेच बिझनेस प्रोसेस सोल्युशन्स (बीपीएस) अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांना सेवा पुरविल्या जातात.
कोंडीमुळे सहा तास केवळ प्रवासात
मुंबई-बंगळुरु महामार्गावरून वाकड चौक तसेच भूमकर चौकापासून हिंजवडी फेज १, फेज २ आणि फेज ३ पर्यंत जाताना वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांमुळे दीड ते दोन तास लागतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांना घरातून तीन तास अगोदर निघावे लागते. तीन तास जाण्यासाठी आणि तीन तास घरी पोहोचण्यासाठी असे सहा तास केवळ प्रवासात जात असल्याने आयटीतील कर्मचारी त्रस्त झाले आहे. दररोजच्या ‘लेटमार्क’मुळे त्यांना जादा तास काम करावे लागते.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून नाराजीचा सूर
हिंजवडीतील रस्त्यांची अवस्था आणि वाहतूक व्यवस्थेची दयनीय अवस्था पाहून येथे येणारे परदेशी कंपन्यांचे प्रतिनिधीही नाराजी व्यक्त करत आहेत. ‘प्रकल्प वेळेत पूर्ण होतील का?’, ‘कर्मचारी कंपनीत वेळेवर पोहोचत असतील का?’ अशा अनेक शंका ते स्थानिक कंपन्यांकडे व्यक्त करत आहेत. परिणामी, महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प दुसरीकडे वळवले जाऊ लागले आहेत, असे आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.
रस्ते दुरुस्तीबाबत एमआयडीसीची उदासीनता
आयटी नगरीतील रस्त्यांच्या समस्येबाबत एमआयडीसीकडे तक्रारी केल्या. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा केला असता अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. उलट मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था होत असल्याचे कारण एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून दिले जाते, असे आयटी कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मेट्रोचे काम कधी पूर्ण होणार आणि येथील रस्ते कधी दर्जेदार होणार, असा प्रश्नही त्यांनी केला.
कर्मचाऱ्यांच्या सुविधांवरील खर्च वाया
येथील कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना विविध सुविधा दिल्या जातात. त्यामध्ये वातानुकूलित कार्यालये, कँटिन, बससेवेचा समावेश आहे. वाहतूक कोंडीला कंटाळून कर्मचारी गैरहजर राहिले तर हा खर्च वाया जातो. कारण प्रशस्त कार्यालयातील वातानुकूलित व्यवस्था काही कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बंद ठेवता येत नाही तसेच कँटिन आणि बससेवाही सुरू ठेवावी लागते. त्यामुळे या सेवांवरील खर्च वाया जातो. त्याचा भुर्दंड कंपन्यांना सहन करावा लागत आहे.