पिंपरी : जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याच्या अफवांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी एलपीजी गॅस एजन्सी व वितरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील गॅस ग्राहकांची अचूक आकडेवारीच पुरवठा विभागाकडे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
याबाबत ‘लोकमत’ने तीन दिवसांपासून विभागीय पुरवठा अधिकारी दिनेश तावरे, अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, चिंचवड परिमंडळ अधिकारी विजयकुमार क्षीरसागर आणि पिंपरी परिमंडळ अधिकारी प्रदीप डंगारे यांच्याशी संपर्क साधला होता. विभागीय पुरवठा अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी देण्याबाबत अन्नधान्य वितरण अधिकारी खताळ व क्षीरसागर यांना सूचना करतो, असे सांगितले होते. त्यानंतर क्षीरसागर यांनी शहरातील एकूण घरगुती गॅस ग्राहकांची अद्ययावत आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगितले.
सध्या शहरात गॅस वितरणातील गोंधळ वाढत असताना प्रशासनाकडेच ग्राहकांची अचूक माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर आकडेवारीच उपलब्ध नसेल, तर गॅस वितरण केंद्रांवर कारवाई किंवा नियोजन कशाच्या आधारे करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सुमारे १५ ते २० लाख घरगुती गॅस वापरकर्ते ?
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांत मिळून सुमारे शंभर गॅस एजन्सी आहेत. एका एजन्सीकडे सरासरी १५ ते २० हजार ग्राहक असल्याची माहिती वितरकांनी दिली. त्यामुळे शहरात सुमारे १५ ते २० लाख घरगुती गॅस वापरकर्ते असल्याचा अंदाज आहे. मात्र, यासंदर्भातील अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अफवांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी अतिरिक्त सिलिंडर मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काही ठिकाणी गॅस बुकिंगनंतर सिलिंडर मिळण्याचा कालावधी वाढल्याचेही सांगितले जात आहे.
पाइपने होणारा गॅसपुरवठा अखंडित : ‘एमएनजीएल’
जागतिक स्तरावर लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) वाहतुकीत अडथळे येत असले, तरी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील घरगुती ग्राहकांना पाइप नॅचरल गॅस (पीएनजी)चा पुरवठा अखंडित राहील, असे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती वापरासाठी १०० टक्के नैसर्गिक वायूचे वाटप करण्यात आले असल्याने पुरवठ्यात कोणतीही टंचाई भासणार नसल्याची माहिती कंपनीने दिली. ‘एमएनजीएल’चे उपाध्यक्ष (मार्केटिंग) सुजित रुईकर यांनी सांगितले की, घरगुती पीएनजी ग्राहक आणि वाहतुकीसाठीचा सीएनजी पुरवठा हे कंपनीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे आठ हजार इंच-किलोमीटर पाइपलाइन जाळे आणि १२५ हून अधिक सीएनजी स्थानके उभारण्यात आली आहेत. सध्या कंपनी आठ लाख घरगुती कनेक्शन आणि ५.५० लाखांहून अधिक सीएनजी वाहनांची गरज पूर्ण करत आहे.
Web Summary : Panic buying grips Pimpri-Chinchwad due to gas shortage rumors. Surprisingly, the supply department lacks accurate customer data, hindering effective distribution and action. Estimates suggest 15-20 lakh users exist. Piped gas supply remains uninterrupted, assures MNGL.
Web Summary : गैस की कमी की अफवाहों से पिंपरी-चिंचवड में दहशत। हैरानी की बात है, आपूर्ति विभाग के पास सटीक ग्राहक डेटा नहीं है, जिससे वितरण और कार्रवाई में बाधा आ रही है। अनुमानित 15-20 लाख उपयोगकर्ता हैं। एमएनजीएल ने पाइप से गैस की आपूर्ति निर्बाध रहने का आश्वासन दिया।