खंडणीसाठी दुकानदाराला मारहाण करून लुटले; भुकुम येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:46 IST2025-07-17T12:43:02+5:302025-07-17T12:46:01+5:30
पिंपरी : दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दुकानात घुसून खंडणीची मागणी करत दुकान मालकास व त्यांच्या मुलास बेदम मारहाण ...

खंडणीसाठी दुकानदाराला मारहाण करून लुटले; भुकुम येथील घटना
पिंपरी : दहा ते बारा जणांच्या टोळक्याने दुकानात घुसून खंडणीची मागणी करत दुकान मालकास व त्यांच्या मुलास बेदम मारहाण केली. संशयितांनी गुगल पे, फोन पे आणि रोख रकमेच्या माध्यमातून एकूण एक लाख चार हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले. मुळशी तालुक्यातील भुकुम येथे रविवारी (दि. १३ जुलै) रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.
युसूफ समीर शेख (२४, रा. लक्ष्मीनगर, पिरंगुट), ऋषिकेश देवीदास कांबळे (२१, रा. सहकारनगर, पिरंगुट), कृष्णा ऊर्फ पिल्या निवृत्ती कांबळे (१९, रा. बालाजीनगर, लवळे फाटा), प्रज्वल चिदानंद मुदळ (१९, रा. बालाजीनगर, लवळे फाटा) यांना अटक केली आहे. कालीचरण ठाकूर, गोट्या भाई, साहिल सांगळे आणि त्याच्या चार साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गोविंद धर्मराज यादव (वय ४५, रा. राका मार्बल दुकानाजवळ, भुकुम) यांनी मंगळवारी (दि. १५) बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दुकान चालू ठेवायचं असेल, तर पाच लाख रुपये व महिन्याला २० हजार रुपये द्यावे लागतील’ अशी धमकी कालीचरण ठाकूर याने दिली. त्यानंतर संशयिताने फिर्यादी व त्यांच्या मुलास मारहाण केली. साहिल सांगळे याने फिर्यादीच्या मुलाच्या मांडीवर चाकूने वार केला. संशयितांनी फिर्यादीचा मोबाइल हिसकावून पासवर्ड मिळवून ऑनलाईन गुगल पेवरून ४१ हजार, फोन पेवरून ४९ हजार रुपये व त्यांच्या मुलाच्या फोन पे अकाउंटमधून चार हजार रुपये काढले. शिवाय १० हजार रुपये रोख रक्कमही जबरदस्तीने घेतली.