सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:15 IST2025-08-06T21:14:55+5:302025-08-06T21:15:25+5:30
तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे.

सत्तेत असून आंदोलनाची नौटंकी; हे तर वरातीमागून घोडे; दादांच्या महामोर्चावर साहेबांच्या गटाची टीका
पिंपरी : पिंपरी- चिंचवड प्रारूप विकास आरखडा प्रसिद्ध झाला. सूचना आणि हरकतींची वेळ संपली, आता राष्ट्रवादी दादा गटाचा महामोर्चा होणार आहे, सत्तेत असूनही आंदोलन करण्याची वेळ, लोकांनी समजायचे काय? वरातीमागून घोडे असा प्रकार आहे. निवडणुकीच्या तोंडावर नौटंकी आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे केली आहे. त्यास दादा गटानेही उत्तर दिले आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रारूप विकास आराखडा १४ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर १४ जुलै ही सूचना आणि हरकतीसाठी शेवटची मुदत होती. त्यातच महापालिका निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. सूचना आणि हरकतीची मुदत संपली सुमारे ५० हजार हरकती आल्या आहेत. या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी महामोर्चाचे आयोजन केले आहे. पूररेषेचा घोटाळा, वाढीव आरक्षणे, गावठाणातील स्थानिक झालेला अन्याय, रिंग रोड अशा विविध विषयासाठी मोर्च्याचे आयोजन केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सोशल मीडियावर टीका केली आहे.
शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, 'महापालिकेत १९९७ मध्ये विकास आराखडा तयार झाला. आपल्या कालखंडामध्ये किती आरक्षण विकसित झाली. ती का होऊ शकली नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्याचबरोबर विकास आराखडा जाहीर झाल्यानंतर सूचना हरकतींसाठी असणारा कालखंड संपल्यानंतर आंदोलन घेणे म्हणजेच 'वरातीमागून घोडे' ही म्हण आंदोलनास लागू पडते. सर्वसामान्यांना फसवण्याचं, दिशाभूल करण्याचे काम दादा गट करीत आहे. सत्ता असूनही आज तुम्हाला न्याय मिळत नसेल तर अवघडच आहे की? अधिवेशनात विकास आराखड्यावर झालेल्या चर्चेत भाजपच्या आमदारांनी मते मांडली. पण राष्ट्रवादीने मत मांडलं नाही. भाजपने डीपी रद्द करण्याची मागणी केली. त्यावेळेस तुम्ही कुठे होतात. कुदळवाडी मध्ये अन्यायकारक कारवाई झाली.
त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते. हिंजवडी आयटी पार्कमधून अनेक कंपन्या बाहेर जात आहेत, याला जबाबदार कोण? हे जनतेसाठी आंदोलन नसून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नौटंकी आहे. भाजपचे आमदार आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनीच डीपी केलेला आहे. त्यामुळे आंदोलनाचा दिखावा कशाला दाखवता. आराखड्यात स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला. कोणत्याही बिल्डरच्या जागांवर आरक्षणे पडलेले नाहीत.'
पिंपरी- चिंचवड महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये विकास आराखडा तयार केलेला आहे. तो अन्यायकारक आहे म्हणून आम्ही जनहितासाठी आंदोलन करत आहोत. त्यावर कुणाला टीका करायची असेल, हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने कार्यालयात बसून हा आराखडा तयार केलेला आहे. तसेच कोणत्याही नागरिकांचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे विचारात घेतलेले नाही म्हणून या आराखडा विरोधात आमचे आंदोलन आहे
- फजल शेख, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट)