जुलै उजाडला तरी ४० हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:07 IST2025-07-05T16:05:49+5:302025-07-05T16:07:24+5:30
शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा दावा यंदाही फोल ठरला आहे.

जुलै उजाडला तरी ४० हजार विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित
- गोविंद बर्गे
पिंपरी : शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शालेय साहित्य देण्याचा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाचा दावा यंदाही फोल ठरला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरही बुधवार (दि.२) पर्यंत केवळ २७ हजार ७०० विद्यार्थ्यांनाच साहित्याचे वाटप झाले आहे. अद्यापही ४० हजार ६५४ विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित आहेत. दरम्यान, वाटपाचा वेग वाढवून सर्वांना साहित्य देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २१७ बालवाड्या असून सात हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, तर ११० प्राथमिक शाळांमध्ये ४७ हजार ५९१ आणि २७ माध्यमिक शाळांमध्ये ९ हजार ७६३ असे एकूण ६४ हजार ३५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
गत वर्षापासून निविदा प्रक्रियेद्वारे पुरवठादारांकडून शालेय साहित्याची खरेदी केली जाते. त्यानंतर हे साहित्य थेट लाभ हस्तांतर पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. यामध्ये दप्तर, बूट, मोजे, खेळाचे बूट, कंपास पेटी, फूटपट्टी, रंगपेटी, वह्या, स्वाध्यायमाला, प्रात्यक्षिक पुस्तिका, चित्रकला वही, नकाशा पुस्तिका, रेनकोट, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली आदी साहित्याचा समावेश आहे.
गेल्या वर्षी ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाले नव्हते. यंदा पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. मात्र, १६ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर हा दावा फोल ठरल्याचे दिसून आले. गेल्या १६ दिवसांत २३ हजार ७०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यातही सर्व साहित्य एकत्र मिळाले नसल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या
शाळेचा प्रकार : शाळांची संख्या, विद्यार्थी संख्या
बालवाडी : २१७ - ७,०००
प्राथमिक शाळा : ११०- ४४,२८७
माध्यमिक शाळा : २७ - ९,७६३
एकूण : ३५४ - ६१,०५०
एकूण : ३५४ शाळा- विद्यार्थी -६१०५०