पंतप्रधान आवास योजनेमधील लाभार्थी म्हणतात,हेच का सरकारने दाखवलेले घरकुलाचे स्वप्न ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:21 IST2025-08-05T16:16:20+5:302025-08-05T16:21:14+5:30
गृहनिर्माण संकुलास अजूनही प्रवेशद्वार नाही. त्यामुळे बाहेरून कुणालाही सहजपणे वावरता येत असून, भटकी कुत्री फिरत आहेत. महिला व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला

पंतप्रधान आवास योजनेमधील लाभार्थी म्हणतात,हेच का सरकारने दाखवलेले घरकुलाचे स्वप्न ?
पिंपरी : महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत चऱ्होली येथे गृहप्रकल्प बांधण्यात आले आहेत. मात्र, यातील सदनिकाधारकांना अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. जानेवारी २०२४मध्ये प्रकल्पाचे हस्तांतर झाले. मात्र, दीड वर्ष उलटून गेले तरी अनेक समस्यांनी हा प्रकल्प ग्रासलेला आहे.
गृहनिर्माण संकुलास अजूनही प्रवेशद्वार नाही. त्यामुळे बाहेरून कुणालाही सहजपणे वावरता येत असून, भटकी कुत्री फिरत आहेत. महिला व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घरे हस्तांतरीत झाल्यानंतर प्रशासनाने या संकुलाची नियमित पाहणी करून सुविधा सुरळीत करण्याची जबाबदारी पार पाडायला हवी होती. मात्र, नागरिकांच्या तक्रारी असूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कार्यवाही अद्याप झालेली नाही.
सांडपाणी प्रक्रिया बंद, दुर्गंधीचा त्रास
परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्र अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही आणि परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
कॉमन हॉल, गार्डन ‘लॉक’मध्येच संकुलातील कम्युनिटी हॉल व गार्डन यांचा उपयोग रहिवाशांना करता यावा, यासाठी ते उघडे ठेवणे अपेक्षित होते. मात्र, ही दोन्ही ठिकाणे आजही बंद असून, कोणतीही सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्था शक्य होत नाही.
ड्रेनेज व्यवस्था अपुरी, पाणी साचते
गटार झाकणासाठी वापरण्यात आलेले गट्टू निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते आहे. चिखल, दुर्गंधी व डास यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
पाणीपुरवठाही अपुरा
रोजच्या वापरासाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा नियमित नाही. विशेषतः उंच मजल्यांवरील सदनिकांमध्ये पाणी पोहोचत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.