मी आमदाराचा पुतण्या आहे; नो एंट्रीत घुसण्याचा अट्टहास, तरुणाची वाहतूक पोलिसांशी हुज्जत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:32 IST2025-08-05T14:29:29+5:302025-08-05T14:32:19+5:30
माणिक चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी संशयिताने त्याच्या ताब्यातील फॉर्च्यूनर गाडी ‘नो एन्ट्री’ असलेल्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्ससमोर उभी केली. ‘मी आमदाराचा पुतण्या

मी आमदाराचा पुतण्या आहे; नो एंट्रीत घुसण्याचा अट्टहास, तरुणाची वाहतूक पोलिसांशी हुज्जत
पिंपरी : ‘मी आमदाराचा पुतण्या आहे’ असे सांगत एका वाहनचालकाने ‘नो एन्ट्री’मध्ये जाण्याचा हट्ट धरून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. ही घटना रविवारी (दि. ३ ऑगस्ट) सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास चाकण येथील माणिक चौकात घडली.
या प्रकरणात पोलिस हवालदार लक्ष्मण आनाजी सांगडे यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फॉर्च्यूनर (एमएच १४/एमके ९७९७) गाडीचा चालक मयूर काळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माणिक चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी संशयिताने त्याच्या ताब्यातील फॉर्च्यूनर गाडी ‘नो एन्ट्री’ असलेल्या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेड्ससमोर उभी केली. ‘मी आमदाराचा पुतण्या मयूर काळे आहे. मी येथूनच जाणार’ असे म्हणत त्याने ‘नो एन्ट्री’तून जाण्याचा हट्ट धरला. त्याने मोठ्याने ओरडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आणि फिर्यादीसह इतर पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच, त्याने अपशब्द वापरून शिवीगाळ केली आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला.