‘आयटीआय’मध्ये ४० टक्के जागा रिक्त; चौथी फेरीत प्रवेशाची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:29 IST2025-08-07T15:28:04+5:302025-08-07T15:29:03+5:30
- निगडी, मोरवाडी आणि कासारवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्याकडे; विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत मुदत

‘आयटीआय’मध्ये ४० टक्के जागा रिक्त; चौथी फेरीत प्रवेशाची संधी
पिंपरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्याकडे जात असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय आणि खासगी आयटीआय संस्थांमध्ये अद्याप ४० टक्के जागा रिक्त आहेत. बुधवारपासून (दि. ६) चौथ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
शहरातील निगडी येथील शासकीय आयटीआयमध्ये एकूण ३७२ जागांपैकी तिसऱ्या फेरीअखेर फक्त १६० जागांवरच प्रवेश निश्चित झाले असून २१२ जागा अद्याप रिक्त आहेत. सुमारे ४१ टक्के जागा भरल्या गेलेल्या नाहीत. दरम्यान, रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करावेत. त्यांना पाचव्या अंतिम फेरीत गुणानुक्रमानुसार रिक्त जागांवर प्रवेशाची संधी मिळणार असल्याची माहिती प्राचार्य शशिकांत साबळे यांनी दिली.
महापालिकेच्या मोरवाडी आयटीआयमध्ये सर्वाधिक ५०० जागा असून त्यातील ३३२ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, १६८ जागा म्हणजेच सुमारे ३४ टक्के जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत. महापालिकेच्या कासारवाडी आयटीआय (महिला) येथे एकूण ११६ पैकी ६१ जागा भरल्या आहेत, तर ५५ जागा रिक्त आहेत, म्हणजेच सुमारे ३९ टक्के जागा शिल्लक आहेत.
पाचवी अंतिम फेरी २८ ऑगस्टपासून
ज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्यासाठी चौथी फेरी महत्त्वाची आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यानंतरही रिक्त जागा राहिल्यास २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान अंतिम म्हणजे पाचवी समुपदेशन फेरी होणार आहे. या अंतिम फेरीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार असून, उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणानुक्रमानुसार आणि पसंतीक्रमानुसारच प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.
आयटीआयमधील अभ्यासक्रमांमुळे केवळ रोजगाराच्या संधीच नव्हे तर आर्थिक स्वावलंबन व उच्च शिक्षणाची वाट खुली होते. विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा. - शशिकांत पाटील, प्राचार्य, मोरवाडी आयटीआय