दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई
By नारायण बडगुजर | Updated: March 22, 2025 20:22 IST2025-03-22T20:22:21+5:302025-03-22T20:22:33+5:30
त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये १० किलो १३८ ग्रॅम गांजा मिळाला.

दुचाकीस्वाराकडून १० किलो गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पिंपळे सौदागरमध्ये कारवाई
पिंपरी : दुचाकीस्वाराला अटक करून त्याच्याकडून पाच लाख ८८ हजार रुपये किमतीचा १० किलो १३८ ग्रॅम गांजा, दोन मोबाइल, दुचाकी जप्त केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि. २०) पिंपळे सौदागर येथे ही कारवाई केली.
हरिश मगन सोनवणे (२७, रा. पिंपरीगाव, मूळ रा. वरवाडे, ता. शिरपूर, जि. धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम गायकवाड आणि पोलिस अंमलदार पिंपळे सौदागर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी संशयित हरिश सोनवणे हा दुचाकीवर सॅकबॅग व ट्रॅव्हलिंग बॅग घेऊन थांबलेला होता. त्याचे नाव व तेथे थांबण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या संशयास्पद हालचालीवरून पोलिसांनी त्याच्या बॅगची तपासणी केली. बॅगमध्ये १० किलो १३८ ग्रॅम गांजा मिळाला.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलिस अंमलदार जावेद बागसिराज, किशोर परदेशी, मयूर वाडकर, प्रसाद कलाटे, गणेश कर्पे व विजय दौंडकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.