नगरपालिका निवडणूक : लोणावळ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:00 IST2025-11-05T15:59:35+5:302025-11-05T16:00:30+5:30
- अनुसूचित जातीसाठी राखीव जागेमुळे रंगत : उमेदवारांची मोर्चेबांधणी वेगात, दावेदारांची शर्यत तीव्र, बैठका, अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरविण्याचे सत्र सुरू

नगरपालिका निवडणूक : लोणावळ्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची लगबग
- नितीन तिकोणे
लोणावळा : नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच लोणावळा शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने या गटातील इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. आरक्षण घोषित होताच समीकरणांमध्ये बदल झाला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. प्रमुख पक्षांतर्फे बैठका, अंतर्गत चर्चा आणि रणनीती ठरविण्याचे सत्र सुरू झाले असून, नगराध्यक्ष पदासाठी चुरस वाढली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी अनेक माजी आणि नवोदित चेहरे पुढे येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य व माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आहे. भाजपचे लोणावळा नाणे मंडळाचे चिटणीस प्रफुल्ल मोहन काकडे यांनीही अर्ज घेतला असून, पक्षश्रेष्ठी आपल्यावर विश्वास दाखवतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत. आमदार सुनील शेळके यांचे समर्थक दीपक मालपोटे यांच्या पत्नी ज्योती मालपोटे यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.
भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्यासह राजेंद्र दिवेकर, सुरेश गायकवाड, गिरीश रमेश कांबळे, डॉ. सुनील जाधव, निरंजन कांबळे आणि अशोक मानकर हेही इच्छुक असल्याचे समजते. या सर्व इच्छुकांपैकी अनेकांनी आमदार शेळके यांच्याकडे उमेदवारीसाठी संपर्क साधल्याची चर्चा आहे.
राजकीय हालचालींना वेग
राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी १२ इच्छुकांनी, तर भाजपकडून सात जणांनी उमेदवारी अर्ज घेतले असल्याची माहिती शहराध्यक्ष रवी पोटफोडे आणि अनिल गायकवाड यांनी दिली. भाजपच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. आमदार सुनील शेळके स्वतः या निवडणुकीवर लक्ष ठेवून असल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे.
मामा-भाचा लढतीची चर्चा
या निवडणुकीत शहरात पुन्हा एकदा मामा विरुद्ध भाचा अशी राजकीय लढत रंगण्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार बाळा भेगडे आणि विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यातील अप्रत्यक्ष स्पर्धेमुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.