LPG Gas Crisis म्हणे गॅस वितरण सुरळीत; मग एजन्सींसमोर रांगा का ? 'पॅनिक बुकिंग'मुळे यंत्रणेवर ताण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:43 IST2026-03-14T12:34:51+5:302026-03-14T12:43:00+5:30
- ‘पॅनिक बुकिंग’मुळे यंत्रणेवर ताण : पुरवठा तेवढाच मात्र मागणी झाली दुप्पट; दोन-दोन वर्षे बुकिंगसाठी निष्क्रिय असणारे पाइपने गॅसपुरवठा घेणारे ग्राहकही सरसावले

LPG Gas Crisis म्हणे गॅस वितरण सुरळीत; मग एजन्सींसमोर रांगा का ? 'पॅनिक बुकिंग'मुळे यंत्रणेवर ताण
- आकाश झगडे
पिंपरी : घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत आहे, टंचाईचे कोणतेही कारण नाही, असे पुरवठा विभाग वारंवार आश्वासित करत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसत आहे. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडर महाग होईल किंवा मिळणार नाही, या भीतीने घरगुती गॅसचा ग्राहक मोठ्या प्रमाणावर ‘पॅनिक बुकिंग’ करत असून, गॅस वितरकांच्या कार्यालयाबाहेर सिलिंडरसाठी रांगा पाहायला मिळत आहेत. व्यावसायिक सिलिंडरचे वितरण थांबवल्यामुळे ते यात दिसत नाहीत.
परिस्थिती नियंत्रणात, तरीही भीती का?
सरकारने युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन आधीच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्याला बंदी घातली आहे. सध्या गॅस बुकिंग केल्यानंतर तीन ते पाच दिवसांच्या आत सिलिंडर घरपोच दिला जात आहे. त्यापुढील बुकिंग ३० दिवसांनी करता येते. युद्धजन्य परिस्थितीच्या आधी घरात चालू असलेला गॅस सिलिंडर संपत आल्यावर दुसरा मोकळा सिलिंडर भरला जात होता. मात्र, मागील काही दिवसात पुढील काळात पुरवठा बंद होईल, या भीतीने घरातील मोकळा सिलिंडर भरण्यासाठी ग्राहक वितरकांकडे गर्दी करत आहेत. याशिवाय अधिकृत नोंदणी नसलेल्या ग्राहकांनीही यात भर घातली आहे. तेही सिलिंडर मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्यांच्याकडे सिलिंडर शिल्लक आहे, तेही आगाऊ साठा करण्यासाठी वितरकांच्या गोदामांबाहेर गर्दी करत आहेत.
सिलिंडर घरपोच मिळण्याची भीती
वितरकांकडे गॅस सिलिंडरची मागणी दुप्पट झाली आहे. पुरवठा मात्र युद्धजन्य परिस्थितीआधी होता तेवढाच आहे. अनेक ग्राहक घरात सिलिंडर असतानाही बुकिंग करून वितरकांकडून घेऊन जात आहेत. यामुळे ग्राहकांना उशिरा घरपोच सेवा मिळत आहे. एकदा सिलिंडर घेतल्यानंतर तीस दिवसांनंतरच दुसरे बुकिंग करता येते, हा नियम अनेकांना अजूनही माहीत नाही. ते ३० दिवसांच्या आतच बुकिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांचे बुकिंग होत नाही. असे ग्राहक वितरकांकडे गर्दी करून बुकिंग होत नसल्याचे सांगत आहेत. घरात पाईपद्वारे गॅसपुरवठा असणाऱ्या ग्राहकांनी सिलिंडरसाठी दोन-तीन वर्षे बुकिंग केले नव्हते, त्यांनीही सिलिंडरसाठी बुकिंग सुरू केले आहे. यामुळे लोकांच्या भीतीमध्ये वाढ होत आहे.
वितरकांकडे क्षमतेपेक्षा जास्त मागणी
पूर्वी शहरातील प्रत्येक गॅस वितरक दिवसाला सरासरी ८०० सिलिंडरचे वितरण करत होते. सध्या ही मागणी दुप्पट होऊन १७०० वर गेली आहे. तेथील कर्मचारी सकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. वितरण सुरळीत ठेवण्यासाठी गोदामातून थेट वितरणावर भर दिला जात आहे.
वितरकांच्या तांत्रिक पळवाटा
गॅस केंद्रांवरील गर्दी आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी काही वितरक आता तांत्रिक पळवाटा शोधत असल्याच्या तक्रारी येत आहेत. ‘तुमचे केवायसी अपडेट नाही’, ‘नोंदणी दिसत नाही’ किंवा ‘नोंदणी जुनी आहे’, ‘सर्व्हर डाऊन आहे’, असे सांगून किंवा ओटीपी येत नसल्याचे कारण देऊन ग्राहकांना माघारी पाठवले जात आहे.
गॅस घेताना ही घ्या काळजी...
गडबडीत किंवा भीतीपोटी घाईघाईने सिलिंडर घेताना सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका, कारण अशा काळात काळाबाजार होण्याची जास्त शक्यता आहे. सिलिंडरची डिलिव्हरी घेताना सील व वजन व्यवस्थित आहे का, गॅस गळती होत नाही ना, याची खात्री करा. अधिकृत पावतीशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून जादा दराने सिलिंडर घेऊ नका, एकाच वेळी अनेक सिलिंडर घरात ठेवणे धोक्याचे ठरू शकते, त्यामुळे गरजेनुसारच बुकिंग करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
घरगुती गॅसपुरवठा पूर्णपणे नियंत्रणात आहे. फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडर वितरण बंद करण्यात आले आहे. ग्राहकांना एका नोंदणीनंतर दुसऱ्या नोंदणीसाठी २५ ते ३० दिवसांची मुदत आहे. मात्र, ग्राहक भीतीने वितरण केंद्रावर गर्दी करत आहेत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. - प्रशांत खताळ, पुरवठा अधिकारी
आमचा गॅस संपत आल्याने आठ दिवसांपूर्वी बुकिंग केले. मात्र, आठ दिवस होऊनही सिलिंडर मिळालेला नाही. तो नक्की कधी मिळेल, याबाबत वितरकही माहिती देत नाहीत.- कल्पना वीर, स्वामी विवेकानंद सोसायटी, वाल्हेकरवाडी
आमच्याकडे मागणी दुप्पट झाली आहे, मात्र पुरवठा पूर्वीसारखाच आहे. अनेक ग्राहक गरज नसतानाही बुकिंग करून येथे येऊन सिलिंडर घेऊन जात आहेत. खरी गरज असणाऱ्या ग्राहकांना पुरवठा होत नाही. यामुळे भीतीच्या वातावरणात भर पडत आहे. - आतिश कांबळे, आम्रपाली गॅस
सध्या मागणीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस घरगुती वापरासाठी वळवल्यामुळे गॅस टंचाई होणार नाही. सरकारने लागू केलेले सर्व नियम काळाबाजार रोखण्यासाठी आहेत. कंपनीकडून मागणी होईल, तेवढा पुरवठा करण्याचे निर्देश वितरकांना आहेत. त्यामुळे ग्राहकांनी घाबरू नये. - शिवाजी ढमाळ, अनुराग गॅस एजन्सी