LPG Gas Crisis : जादा किंमत आणि वेळेच्या कटकटीने सौर चूल दुर्लक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:15 IST2026-03-19T18:15:25+5:302026-03-19T18:15:43+5:30

- गॅसटंचाईच्या काळातील शाश्वत ऊर्जेच्या पर्यायांकडे ग्राहकांची पाठ; सोसायटीतील सामायिक गच्चीवर जाऊन सौर चुलीद्वारे जेवण बनवणे व्यावहारिक वाटत नाही

pimpari-chinchwad LPG Gas Crisis Solar cookers are neglected due to high cost and time constraints | LPG Gas Crisis : जादा किंमत आणि वेळेच्या कटकटीने सौर चूल दुर्लक्षितच

LPG Gas Crisis : जादा किंमत आणि वेळेच्या कटकटीने सौर चूल दुर्लक्षितच

- आकाश झगडे

पिंपरी : घरगुती गॅस सिलिंडरचा विस्कळीत पुरवठा आणि व्यावसायिक सिलिंडरचा थांबलेला पुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा वेळी सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर चालणारी सौर चूल पर्याय असतानाही पिंपरी-चिंचवडकरांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. सौर चुलीची जादा किंमत आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे कोळसा आणि महागड्या विजेच्या इंडक्शनला पसंती मिळत आहे. शाश्वत ऊर्जा देणाऱ्या सौर चुलीला केवळ सूर्यप्रकाशाची आवश्यकता भासते. एकदा गुंतवणूक केली की पुढील कित्येक वर्षे तिचा वापर अन्न शिजवण्यासाठी करता येतो. कडक उन्हाळ्यात पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यप्रकाश भरपूर असतानाही, उपनगरातील छतांवर किंवा गॅलरींमध्ये सौर चुली दिसत नाहीत.

शहरात मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. फ्लॅटमध्ये स्वतःची उघडी जागा मिळत नाही. सामायिक गच्चीवर जाऊन सौर चुलीद्वारे जेवण बनवणे अनेकांना व्यावहारिक वाटत नाही. सौर चुलीवर डाळ-भात किंवा भाजी शिजण्यासाठी साधारण दोन तास लागतात. नोकरदारांना आणि सकाळी लवकर डबा बनवणाऱ्या गृहिणींना इतका वेळ थांबणे परवडत नाही. सौर चुलीवर केवळ वाफेवरचे पदार्थ शिजवता येतात. तळण्यासाठी किंवा चपाती भाजण्यासाठी तिचा उपयोग होत नाही. पावसाळ्यात किंवा आभाळ भरून आल्यावर, रात्रीच्या वेळी जेवण बनवण्यासाठी तिचा वापर करता येत नाही. त्यामुळे नागरिक शाश्वत पर्याय म्हणून तिकडे पाहत नाहीत.

चौकशीसाठी फोन, मात्र प्रत्यक्षात विक्री होत नाही

सौर चुलींच्या चौकशीसाठी विचारणा करण्याचे प्रमाण वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, विकत घेण्यासाठी कोणी येत नाही. तिच्यामुळे प्रदूषण होत नाही, तरीही सौरी चूल दुर्लक्षित आहे. चांगल्या दर्जाच्या सौर चुलीची किंमत पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे. त्याऐवजी दोन-तीन हजारांत मिळणारे इंडक्शन घेणे अधिक सोयीचे समजले जाते. इंडक्शन किंवा गॅस एका बटणावर सुरू होतात. सौर चूल मात्र वारंवार सूर्याच्या दिशेनुसार फिरवावी लागते. ते अनेकांना कटकटीचे वाटते.

जनजागृती करण्याची गरज

गॅसवरच्या सवयी, जागरूकतेचा अभाव आणि वापरातील मर्यादा यामुळे सौर चुलींचा वापर कमी दिसून येतो. महापालिका व विविध संस्थांकडून जनजागृतीचे प्रयत्न होत असले तरी त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

बाजारपेठेतील अंदाजे दर (₹) 

५० ते ६० किलो कोळसा
२,५०० ते ४,५०० इलेक्ट्रिक इंडक्शन
५,००० ते ८,००० सौर चूल


गॅस टंचाईच्या काळात सौर चुलींच्या चौकशीसाठी फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, विकत घेण्यासाठी कोणी येत नाही - राजेंद्र पांचाळ, सौर चुलींचे विक्रेते.

Web Title : एलपीजी संकट के बावजूद, सौर चूल्हे लागत और असुविधा के कारण उपेक्षित।

Web Summary : एलपीजी की कमी के बावजूद, पिंपरी-चिंचवड के निवासी उच्च लागत और समय लेने वाले उपयोग के कारण सौर चूल्हों से बचते हैं। इंडक्शन कुकटॉप्स और कोयले को प्राथमिकता दी जाती है। जागरूकता और प्रयोज्यता की कमी से गोद लेने में बाधा आती है।

Web Title : Despite LPG Crisis, Solar Cookers Ignored Due to Cost, Inconvenience.

Web Summary : Despite LPG shortages, Pimpri-Chinchwad residents avoid solar cookers due to high cost and time-consuming use. Induction cooktops and coal are preferred. Lack of awareness and usability issues hinder adoption.