LPG Gas Crisis : गॅसटंचाईची हिंजवडी आयटी पार्कला झळ; घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:00 IST2026-03-15T11:59:25+5:302026-03-15T12:00:35+5:30

- कंपन्यांच्या कॅन्टीनमधील मेनूतील खाद्यपदार्थांमध्ये घट : कर्मचाऱ्यांच्या ‘पीजी’तील मेससेवाही विस्कळीत

pimpari-chinchwad LPG Gas Crisis Gas shortage hits Hinjewadi IT Park; Instructions to bring lunch boxes from home | LPG Gas Crisis : गॅसटंचाईची हिंजवडी आयटी पार्कला झळ; घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना

LPG Gas Crisis : गॅसटंचाईची हिंजवडी आयटी पार्कला झळ; घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना

- गोविंद बर्गे

पिंपरी : शहरात निर्माण झालेल्या एलपीजी गॅसटंचाईचा परिणाम आता हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांवरही जाणवू लागला आहे. कंपन्यांमधील कॅन्टीन सेवा आणि हाॅटेलमधील खाद्यपदार्थ पुरवठा विस्कळीत झाल्याने कर्मचाऱ्यांना घरून जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कामाच्या धावपळीत असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये कॅन्टीन किंवा कंत्राटदारांमार्फत चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था केली जाते. तेथे चायनीज, पंजाबी आणि दाक्षिणात्य पदार्थांसह विविध खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. मात्र, सध्या एलपीजी गॅसचा पुरवठा बंद असल्याने कॅन्टीन चालविणाऱ्या कंत्राटदारांना अडचणी येत आहेत. परिणामी तेथील खाद्यपदार्थांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली आहे.

पूर्वी नाश्ता किंवा जेवणासाठी आठ ते दहा प्रकारचे पदार्थ उपलब्ध असत. मात्र, सध्या दोन ते तीन पदार्थच मिळत असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. काही कंपन्यांच्या मनुष्यबळ विभागाने कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात घरून जेवणाचा डबा आणण्याचा सल्ला दिला आहे.

‘पीजी’मधील मेस सेवा विस्कळित

आयटीनगरीत नोकरीसाठी येणाऱ्या अनेक तरुण-तरुणींसाठी पेईंग गेस्ट (पीजी) ही राहण्याची व्यवस्था आहे. घरापासून दूर राहणाऱ्या मुली आणि मुलांसाठी ‘पीजी’मधील मेस हेच मुख्य साधन असते. मात्र, अनेक मेसमध्ये रात्रीचे जेवण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

माझ्या काही मैत्रिणी ‘पीजी’मध्ये राहतात. तेथेही अशीच परिस्थिती आहे. रोज बाहेरून खाद्यपदार्थ मागवावे लागत आहेत. मात्र, ते सर्वांसाठी परवडणारे नाही. या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन प्रशासनाने व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा. - ऋतुजा कदम, आयटी कर्मचारी.
 

घरूनच जेवणाचा डबा आणण्याबाबत दोन दिवसांपूर्वी मनुष्यबळ विभागाचा ई-मेल आला. कंपनीच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची संख्याही कमी झाल्याचे त्यात म्हटले आहे. आता घरूनच जेवणाचा डबा घेऊन जात आहोत.- अजिंक्य केवळे, आयटी कर्मचारी.

आमची कंपनी चहा, नाश्ता, जेवणाची सुविधा देते. मात्र, सध्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांची संख्या कमी झाली आहे. घरूनच जेवणाचा डबा आणण्याच्या सूचना शुक्रवारी ई-मेलद्वारे कंपनीकडून देण्यात आल्या आहेत.- निमेश गुप्ता, आयटी कर्मचारी.


हिंजवडी येथे ‘पीजी’मध्ये राहतो. गॅसटंचाईमुळे जेवणातील पदार्थ कमी केले जातील, असे सांगितले आहे. मात्र, अद्याप जेवण सुरळीत सुरू आहे. कंपनीतही पूर्वीसारखेच नाश्ता व जेवण मिळत आहे. सध्या तीन दिवस वर्क फ्राॅम होम करावे लागत आहे.- आकाश मेनसे, आयटी कर्मचारी.

Web Title : गैस की कमी से हिंजेवाड़ी आईटी पार्क प्रभावित; कर्मचारियों को दोपहर का भोजन लाने की सलाह।

Web Summary : एलपीजी गैस की कमी के कारण हिंजेवाड़ी आईटी पार्क में व्यवधान उत्पन्न, कैंटीन सेवाएं प्रभावित। कर्मचारियों को दोपहर का भोजन लाने की सलाह, क्योंकि भोजन विकल्प कम हुए। पीजी मेस भी प्रभावित।

Web Title : Hinjewadi IT Park hit by gas shortage; employees told to bring lunch.

Web Summary : Hinjewadi IT Park faces disruption due to LPG gas shortage, impacting canteen services. Employees are advised to bring lunch as food options decrease. PG messes also affected.