चऱ्होलीमधील भोसले वस्तीत बिबट्याचा शिरकाव; कुत्र्यावर हल्ला करून केले ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:52 IST2025-12-06T13:51:44+5:302025-12-06T13:52:24+5:30
- मातीवर बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळले : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून शेत परिसरात, तसेच पाण्याच्या साठ्याजवळ अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे

चऱ्होलीमधील भोसले वस्तीत बिबट्याचा शिरकाव; कुत्र्यावर हल्ला करून केले ठार
भोसरी : चऱ्होली येथील भोसले वस्ती परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या प्रकाराची माहिती गुरुवारी सकाळी उघडकीस आली. अमोल कुंडले यांच्या घराजवळील शेतात एका कुत्र्याचा अर्धवट अवस्थेतील देह पाहून बिबट्याच्या उपस्थितीची पुष्टी झाली.
स्थानिक नागरिक सकाळी शेताकडे गेल्यावर कुत्र्यावर झालेल्या हल्ल्याचे स्पष्ट चिन्हे दिसून आली. आसपासच्या मातीवर बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळले आहेत. रात्री उशिरापर्यंत परिसरात हा जंगली प्राणी फिरत असल्याची दाट शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शेत परिसरात, तसेच पाण्याच्या साठ्याजवळ अनेक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्राण्याचा मागोवा घेण्यासाठी वनरक्षक आणि अधिकारी सतत गस्त घालत आहेत.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी एकटे बाहेर न पडण्याचे, लहान मुले व पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी गटानेच जाणे योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांनी बिबट्याच्या हालचालींबाबत सतत वनविभागाशी संपर्कात राहण्याची विनंती केली आहे.
आमच्या भोसले वस्तीच्या बाजूला बाजरी आणि उसाची शेती असल्याने बिबट्याला दबा धरण्यासाठी जागा आहे. त्यामुळे भोसले वस्ती व आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे. - विक्रम भोसले, भोसले वस्ती, रहिवासी.