Pimpari-chinchwad : तुटवड्याची फक्त अफवाच..! शहरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:10 IST2026-03-28T16:08:32+5:302026-03-28T16:10:23+5:30
- वाहनचालकांनी घाबरून इंधन साठवू नये : पंपचालकांचे आवाहन

Pimpari-chinchwad : तुटवड्याची फक्त अफवाच..! शहरात सीएनजीचा पुरवठा सुरळीत
पिंपरी : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरात सीएनजी तुटवडा निर्माण झाल्याच्या अफवा वेगाने पसरत असल्या, तरी प्रत्यक्षात सध्या सीएनजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. वाहनचालकांनी विनाकारण घाबरून पंपांवर गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पंपचालकांनी केले आहे.
शहरात ७० ते ७५ सीएनजी पंप आहेत. काही दिवसांपासून सीएनजीचा पुरवठा बंद होणार, पुन्हा लॉकडाऊन लागू शकतो, अशा अफवांमुळे वाहनचालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परिणामी अनेक जण वाहनांच्या टाक्या भरून घेत असून काही ठिकाणी पंपांवर अचानक गर्दी होत आहे.
सीएनजी गॅसच्या वाढलेल्या मागणीमुळे काही पंपांवर तात्पुरता ताण निर्माण होत आहे. मात्र, एकूण पुरवठा साखळी सुरळीत आहे. पिंपरी, चिंचवड आणि चिखली परिसरातील जाधववाडी येथील एमएनजीएल कंपनीच्या सीएनजी पंपावर पाहणी केली असता पुरवठा नियमित सुरू असल्याचे दिसून आले.
सीएनजीचा पुरवठा सुरळीत आहे. सध्यातरी कोणताही अडचण नाही. परंतु, नागरिक घाबरून पंपांवर गर्दी करतात. ते जादा इंधन भरत असल्याने साठा लवकर संपत आहे. - ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर असाेसिएशन, पुणे
अफवांमुळे वाहनचालक पंपावर गर्दी करतात आणि इंधनाच्या टाक्या फुल करतात. त्यामुळे एखाद्या पंपावरील साठा संपतो. त्याचा परिणाम परिसरातील अन्य पंपांपर होतो. नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये. - रवी शर्मा, व्यवस्थापक, पेट्रोलपंप, चिंचवड
आमच्या एमएनजीएलच्या पंपावर सीएनजीचा पुरवठा सुरळीत आहे. कोणतीही टंचाई नाही. वाहनचालकांना पुरेसा सीएनजी पुरवठा केला जात आहे. - अरुण शिंदे, इनचार्ज, एमएनजीएल फिलिंग स्टेशन, जाधववाडी
सीएनजी सध्यातरी सुरळीत मिळत आहे. परंतु, तुटवडा भासू शकतो या शक्यतेने वाहनचालक घाबरत आहेत. पुरवठा कधीही बंद होईल, या भीतीने मी मोटारीची टाकी भरून घेतली आहे. - रवींद्र नगरकर, कासारवाडी
मी रिक्षाचालक आहे. दररोज चिंचवडच्या अजंठानगर येथील पंपावर सीएनजी भरतो. कोणताही तुटवडा नाही. मात्र, टंचाई होण्याची चर्चा ऐकायला मिळते. प्रवासीसुद्धा सीएनजी मिळतो का, असे प्रश्न विचारतात. - धर्मा अडसुळे, रिक्षाचालक, चिखली