Pimpari-chinchwad : भोसरीत शेकडो वर्षांची परंपरा जिवंत; ‘बारा विड्यां’तून वर्षाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 15:03 IST2026-03-21T15:03:26+5:302026-03-21T15:03:34+5:30
यावर्षी मध्यम स्वरूपाचा समाधानकारक शेतीला पूरक असा पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याचे सांगितले.

Pimpari-chinchwad : भोसरीत शेकडो वर्षांची परंपरा जिवंत; ‘बारा विड्यां’तून वर्षाचा अंदाज
भोसरी : शहरीकरणाच्या वाढत्या लाटेतही परंपरेची घट्ट पकड राखत भोसरीकरांनी आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन केले आहे. पाडव्याच्या पूर्वसंध्येला ‘बारा मराठी महिन्यांचे बारा विडे’ उघडून वर्षभरातील ऋतु, पावसाचे अंदाज आणि वातावरणाचा वेध घेण्याची अनोखी परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली.
भोसरी गावठाणातील श्री भैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत गावच्या हेमंत तिखे, माधव तिखे पुरोहितांनी प्रत्येक विडा उघडत पंचांगाच्या आधारे येत्या वर्षाचे संकेत मांडले. ज्वारी, बाजरी, साळी आदी धान्यांनी सजवलेल्या या विड्यांमधून गावाच्या शेती आणि वातावरणाचा अंदाज घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात असून यावर्षी मध्यम स्वरूपाचा समाधानकारक शेतीला पूरक असा पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याचे सांगितले.
याच बैठकीत ४ व ५ एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचे नियोजनही करण्यात आले. मागील वर्षाच्या जत्रेचा आढावा घेत यंदाच्या उत्सवाच्या जबाबदाऱ्या ग्रामस्थांमध्ये वाटप करण्यात आल्या. उत्सवानिमित्त विविध पारंपरिक आणि रोमांचक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. ४ एप्रिल रोजी सकाळी बैलगाडा शर्यती रंगणार असून लाखो रुपयांची बक्षिसे स्पर्धकांना दिली जाणार आहेत. सायंकाळी ढोल-लेझीमच्या गजरात छबिना मिरवणूक निघणार असून त्यानंतर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रंगणार आहे.
५ एप्रिल रोजी गावजत्रा मैदानात नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा थरार अनुभवता येणार आहे तसेच सकाळी भैरवनाथ मंदिरात चक्रीभजनाने धार्मिक वातावरणाची सुरुवात होणार आहे. परंपरा, श्रद्धा आणि उत्साह यांचा संगम असलेला भोसरीचा भैरवनाथ उत्सव यंदाही मोठ्या दिमाखात साजरा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भोसरी गावठाणातील श्री भैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे, नितीन लांडगे, सागर गवळी, विराज लांडे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, पंडित गवळी, विश्वनाथ लांडे, विजय फुगे, महादेव गव्हाणे, माजी नगरसेवक व देवाचे भगत राजेंद्र लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे तसेच भोसरी उत्सव समितीचे उत्सवप्रमुख जंगल फुगे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, पंडित गवळी, भानुदास फुगे, गुलाब लांडगे, अशोक लांडगे, अमर लांडगे, राहुल गवळी, राजेंद्र लांडगे आदींनी श्री भैरवनाथ महाराज उत्सवासंबंधी विचार मांडले. मदन गव्हाणे, गणपत गव्हाणे, भानुदास लांडगे, सुदाम माने, विलास फुगे, सम्राट फुगे, किशोर गव्हाणे, अनिल फुगे, नारायण गव्हाणे, विष्णू लांडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.