Heavy Rain : जोरदार पावसामुळे नाले तुंबले, रस्त्यांवर साचली पाण्याची तळी

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: June 8, 2025 14:53 IST2025-06-08T14:52:20+5:302025-06-08T14:53:38+5:30

महापालिका प्रशासनाचे अपयश चव्हाट्यावर : रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांसह वाहनचालकांची तारांबळ; वाहने बंद पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी, नोकरदार-विद्यार्थ्यांना मनस्ताप 

pimpari-chinchwad heavy rains caused drains to overflow, creating pools of water on the roads | Heavy Rain : जोरदार पावसामुळे नाले तुंबले, रस्त्यांवर साचली पाण्याची तळी

Heavy Rain : जोरदार पावसामुळे नाले तुंबले, रस्त्यांवर साचली पाण्याची तळी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी सकाळीच (दि. ६) मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाण्याची तळी साचली. नाले तुंबल्याने, रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक मंदावली, तर काही ठिकाणी वाहने बंद पडल्यामुळे मोठी कोंडी निर्माण झाली. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. महापालिका प्रशासनाचे अपयश पुन्हा चव्हाट्यावर आले.

शहरातील मोशी, भोसरी, आकुर्डी, वाकड, थेरगाव, चिखली, पिंपळे सौदागर आणि भोसरी या भागांत पावसाचे विशेष प्रमाण नोंदवण्यात आले. अनेक शासकीय-निमशासकीय आणि खासगी नोकरदार व विद्यार्थ्यांना पावसामुळे वेळेवर पोहोचण्यात अडचणी आल्या. महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सतत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांनी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने रविवारीही (दि.७) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. तुरळक ठिकाणी वीज कोसळण्यासह वादळ, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे.

रस्त्याला तळी-नद्यांचे स्वरूप

शांतीनगर ते इंद्रायणी कॉर्नर रस्ता, भोसरी एमआयडीसी, भोसरी एमआयडीसी देहूरोड–कात्रज बाह्यवळण रस्त्यावर व वाकड येथील इंदिरा कॉलेजसमोर, टेल्को रोड, लांडेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रस्त्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना नदी ओलांडल्याचा अनुभव आला.
 

घराबाहेर पडताना काळजी घ्या

या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, जलजमाव झालेल्या भागांतून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, थेरगाव येथील महापालिका रुग्णालय परिसरासह शहरातील इतर भागातही झाडे कोसळल्याचे प्रकारही समोर आले आहेत. नागरिकांनी शक्यतो घरात राहावे, घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, विजेच्या खांबांपासून व झाडांपासून दूर रहावे, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महापालिका म्हणते, पाऊस जास्त झाला !

शनिवारी सकाळच्या वेळेत अगदी कमी वेळात जोरदार पाऊस झाला. नाल्यांमधून पाणी जाण्यास उशीर झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. काही ठिकाणी अर्ध्या तासात पाणी मोकळे झाले, तर काही ठिकाणी पाणी जाण्यास दोन ते तीन तास उशीर झाला.  - मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

Web Title: pimpari-chinchwad heavy rains caused drains to overflow, creating pools of water on the roads