गारपीट-अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा; बारामती-आंबेगावमध्ये पिके जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 11:49 IST2026-04-02T11:48:52+5:302026-04-02T11:49:22+5:30

- बारामती तालुक्यातील धुमाळवाडी, पवईमाळ, आदी भागांमध्ये झालेल्या गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

pimpari-chinchwad Hailstorm-storm hits the district; Crops destroyed in Baramati-Ambegaon | गारपीट-अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा; बारामती-आंबेगावमध्ये पिके जमीनदोस्त

गारपीट-अवकाळीचा जिल्ह्याला तडाखा; बारामती-आंबेगावमध्ये पिके जमीनदोस्त

बारामती / मंचर :पुणे जिल्ह्यासह बारामती, आंबेगाव, दौंड तालुक्यांसह बहुतांश भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक ठिकाणी गारपीट झाली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेल्या पालेभाज्या जमीनदोस्त झाल्या आहेत. काही भागांत शेतात पावसाचे तळे साचले तर रस्ते, ओढे-नाले पाण्याने भरून वाहताना दिसले.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी सायंकाळी अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने दमदार हजेरी लावली. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी, पवईमाळ, आदी भागांमध्ये झालेल्या गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केळी, आंबा, ऊस, चारा पिके, तसेच पालेभाज्या यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. गारांच्या माऱ्यामुळे झाडांची पाने गळून पडली असून, फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, खडकवाडी, पोंदेवाडी, वाळूंजनगर, रोडेवाडी फाटा, लोणी, रानमळा, रोडेझाप आणि धुमाळस्थळ परिसरात गारपिटीचा मोठा तडाखा बसला. या भागात शेतात पावसाचे पाणी साचून तळी निर्माण झाली असून, रस्त्यांवरून व ओढ्या-नाल्यांतून पाणी वाहत होते. या परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतले जाणारे कांदा पीक आधीच कमी बाजारभावामुळे अडचणीत होते. त्यातच गारपीट झाल्याने शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला, तर उभ्या कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले. कांद्याच्या बीजोत्पादनाच्या शेतांनाही मोठे नुकसान झाले.

काढणीला आलेल्या गहू व हरभरा पिकाच्या शेतात पाणी साचल्याने ही पिके भुईसपाट झाली. मिरची, कलिंगड, फ्लॉवर, काकडी या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी रस्त्यांवर, शेतात तसेच गोठ्यांजवळ गारांचा थर साचल्याचे चित्र दिसून आले. आंब्याच्या झाडांवरील कच्च्या कैऱ्या गळून पडल्याने आंबा बागायतदारांनाही मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

शिवारात उभे असलेले हिरवेगार पीक क्षणांत सपाट झाल्याचे चित्र पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. वर्षभराच्या कष्टाचे स्वप्न डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी भावुक झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसतानाच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.

नुकसानभरपाईची मागणी

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बारामती, आंबेगाव, दौंडसह इतर भागांतील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

Web Title : ओलावृष्टि और असमय बारिश से पुणे जिले में तबाही; फसलें बर्बाद

Web Summary : पुणे, बारामती और आंबेगांव में असमय बारिश और ओलावृष्टि से फसलें और सब्जियां तबाह हो गईं। खड़ी फसलें बर्बाद होने और कटाई के लिए तैयार उपज नष्ट होने से किसानों को भारी नुकसान हुआ है। किसानों को मुआवजे की मांग है क्योंकि वे इस अप्रत्याशित प्राकृतिक आपदा से संकट में हैं।

Web Title : Hailstorm, Unseasonal Rain Devastate Pune District; Crops Flattened

Web Summary : Unseasonal rains and hailstorms lashed Pune, Baramati, and Ambegaon, devastating crops and vegetables. Farmers face huge losses as standing crops were flattened and ready-to-harvest produce was destroyed. Compensation is demanded as farmers are in distress due to this unexpected natural disaster.