हिंजवडीत पाच सेल्समननी केला १० लाखांच्या मालाचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:32 IST2025-11-01T15:30:59+5:302025-11-01T15:32:14+5:30
आपापसात संगनमत करून दुकानदाराच्या मोबाइलवर आलेले डिलिव्हरी ओटीपी स्वतःकडे घेतले. दुकानदाराच्या नावाने पाठविलेला माल स्वतःकडे ठेवला.

हिंजवडीत पाच सेल्समननी केला १० लाखांच्या मालाचा अपहार
पिंपरी : पाच सेल्समननी दुकानदाराच्या नावे माल देऊन दुकानदाराकडून ओटीपी घेत नऊ लाख ९० हजार २३० रुपयांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथील हायवलुप ई-काडूमर्स कंपनीत घडली.
मल्लय्या विद्यानंद हिरेमठ (रा. सोलापूर), अक्षय जगन्नाथ झेंडे (रा. शिवाजी चौक, गणेश मंदिराजवळ हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे), अकील रज्जाक शेख (रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), मंजुनाथ गिरमल्ला गौडगांव (रा. नागणसूर), चंद्रकांत रवींद्र उमाळे (रा. सुतारआळी, पिंपळे निलख) यांच्यावर शुक्रवारी (दि. ३१) गुन्हा दाखल झाला. आण्णासाहेब पोपट देशमुख (रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. सर्व संशयित कंपनीत सेल्समन आहेत. त्यांनी आपापसात संगनमत करून दुकानदाराच्या मोबाइलवर आलेले डिलिव्हरी ओटीपी स्वतःकडे घेतले. दुकानदाराच्या नावाने पाठविलेला माल स्वतःकडे ठेवला. नंतर तो माल बाजारात विकून कंपनीच्या एकूण नऊ लाख ९० हजार २३० रुपयांचा अपहार केला.