अखेर डांगे चौक-हिंजवडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास;महापालिकेची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:35 IST2025-07-17T16:35:19+5:302025-07-17T16:35:51+5:30

वाकडच्या काळा खडक परिसरात महापालिकेची कारवाई : तब्बल ४० दुकाने, ५६ घरे जमीनदोस्त; ४५ हजार चौरस फूट क्षेत्रफळावरील अतिक्रमणे हटवली; दोनशे पोलिसांचा बंदोबस्त

pimpari-chinchwad Finally the Dange Chowk-Hinjawadi road took a breath of fresh air | अखेर डांगे चौक-हिंजवडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास;महापालिकेची कारवाई

अखेर डांगे चौक-हिंजवडी रस्त्याने घेतला मोकळा श्वास;महापालिकेची कारवाई

- महेश मंगवडे 

वाकड : ‘लोकमत’च्या दणक्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने डांगे चौक-हिंजवडी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वाकडमधील काळा खडक परिसरातील अतिक्रमणांवर बुधवारी पोलिस बंदोबस्तात हातोडा टाकला. या कारवाईत ४५ हजार चौरस फूट क्षेत्रावरील क्षेत्रफळावरील ४० दुकाने, शेड आणि ५६ घरे जमीनदोस्त करण्यात आली आणि अखेर डांगे चौक-हिंजवडी रस्त्याने मोकळा श्वास घेतलेला पाहायला मिळाला.

भूसंपादनाअभावी अनेक ठिकाणी रखडलेले रस्त्याचे रूंदीकरण, वाहतुकीच्या विळख्यात अडकलेला भूमकर चौकातील भुयारी मार्ग, काळा खडक झोपडपट्टीच्या अतिक्रमणांचा वेढा यामुळे डांगे चौक-हिंजवडी रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. भूमकर चौक, काळा खडक रस्त्यावरील कोंडीचा आयटीयन्स, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांचा रोजच त्रास सहन करावा लागत होता. रखडलेले रुंदीकरण येथील वाहतूक समस्येचे मूळ कारण होते. याबाबत बुधवारीच ‘लोकमत’ने बातमीद्वारे आवाज उठवला होता. या दणक्यानंतर महापालिकेची यंत्रणा खडबडून जागी झाली.

बुधवारी सकाळी सात वाजताच काळा खडक परिसरात आठ जेसीबी, दहा डम्पर, एक पोकलेन आणि शंभर मजुरांच्या साह्याने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला सुरुवात झाली. दोनशे पोलिस कर्मचारी व एमएसएफच्या दोन तुकड्यांचा फौजफाटा तैनात होता. दुपारपर्यंत २५० मीटर लांब व १५ मीटर रुंदीपर्यंतची सुमारे ४५ हजार चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

काळा खडक परिसरातील रस्ता रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले होते. झोपडपट्टीतील रहिवाशांनी अनेक दुकाने, शेडची अतिक्रमणे केली होती. महापालिकेने यापूर्वी अतिक्रमणधारकांना अनेक वेळा नोटिसाही बजावल्या होत्या, तरीही ही अतिक्रमणे हटत नसल्याने अखेर कारवाई करून ती हटविण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त आण्णा बोदडे, शहरी दळण-वळण विभागाचे सहशहर अभियंता बापू गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे, अमित पंडित, पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड व शिवाजी पवार, कार्यकारी अभियंते राजेंद्र शिंदे, सुनील पवार, अभिमान भोसले, दिलीप लांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, सतीश कसबे उपस्थित होते.

इतर ठिकाणीही कारवाई होणार का?

काळा खडक परिसरात महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी कारवाई करण्यात आली. आता अशी कारवाई इतर ठिकाणीही महापालिका करणार का, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. शहरातील अनेक मार्गांवर रखडलेले रुंदीकरण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

काळा खडक परिसरात अनेक ठिकाणी झोपडपट्टीधारकांनी घरे तसेच दुकानांचे रस्त्यालगत अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. वाहतुकीच्या कोंडीची समस्या पाहता या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यकच होते. काळा खडक झोपडपट्टी परिसर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये नियोजित असून येथील रहिवाशांसाठी तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे. - बापू गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळण-वळण विभाग

Web Title: pimpari-chinchwad Finally the Dange Chowk-Hinjawadi road took a breath of fresh air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.