देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित
By विश्वास मोरे | Updated: May 27, 2025 11:28 IST2025-05-27T11:23:40+5:302025-05-27T11:28:28+5:30
शेतकरी, नागरिक हवालदिल : रस्ते, शाळा, मैदानाचे आरक्षण; यमुनानगर, रावेत, मामुर्डीलाही फटका, तळवडे आयटीपार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपो, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स विविध आरक्षणे प्रस्तावित

देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या रेड झोनची सीमा चिखलीपर्यंत; निम्मे तळवडे, विकासनगरही बाधित
पिंपरी : देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या सीमेवर असणाऱ्या तळवडे, यमुनानगर, विकासनगर, रावेत, मामुर्डी परिसरात रेड झोन रेषेचे सीमांकन केले आहे. विकास आराखड्याच्या नकाशातील रेड झोन कायम झाल्यास मोठ्या प्रमाणावर क्षेत्र बाधित होणार आहे. सर्वाधिक फटका तळवडे परिसरास बसणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील आणि देहूरोड, देहूगावच्या प्रवेशद्वारावर असणारे गाव म्हणजे तळवडे. हा देहूरोड येथील दारूगोळा कारखान्याच्या लगतचा परिसर आहे. सुरुवातीला तळवडेकरांची जमीन लष्करात आणि त्यानंतर तळवडे माहिती-तंत्रज्ञान नगरीसाठी तसेच एमआयडीसीमध्ये संपादित केली गेली.
रस्ते आणि सार्वजनिक सुविधांची टाकली आरक्षणे
रेड झोन असल्याने सार्वजनिक सुविधांची आरक्षणे आहेत. १८ मीटर रस्ते प्रस्तावित केले आहेत. टाउन हॉल, खेळाचे मैदान, माध्यमिक व प्राथमिक शाळा, कम्युनिटी सेंटर, शॉपिंग आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्रसूतिगृह, रुग्णालय अशी विविध आरक्षणे प्रस्तावित आहेत. औद्योगिक क्षेत्राचेही आरक्षण दिसते. नागरी वस्तीत रहिवासी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. तळवडेचा मोठा भाग रेड झोनमध्ये दिसून येतो.
उर्वरित क्षेत्रामध्ये नागरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले आहे. आता तळवडे आयटी पार्कमध्ये युनिव्हर्सिटी सब सेंटर आणि पीएमपी बस डेपोचे आरक्षण प्रस्तावित केले आहे. तळवडे एमआयडीसीमधूनही रेड झोनची रेषा दर्शविण्यात आली आहे. त्यात ती पुढे तळवडे गावठाणाबाहेरून नदीला स्पर्शन गणेशनगर, सोनवणेवस्ती, ज्योतिबानगर आणि स्पाईन रोडमार्गे यमुनानगर, प्राधिकरण परिसरापर्यंत जाणार आहे.
अधिकृत नकाशे अद्याप प्रसिद्ध केले नाहीत
लष्कर आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने रेड झोन नकाशे जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यापूर्वीच महापालिकेचा विकास आराखडा प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये रेड झोन रेषा प्रस्तावित केली आहे. सध्या अधिकृत नकाशे प्रकाशित करण्यात आले नाहीत.
परिसरात महत्त्वपूर्ण इतर आरक्षणे नाहीत
रेड झोनमुळे इतर कोणतेही महत्त्वपूर्ण आरक्षण टाकलेले दिसून येत नाही. किवळे-विकासनगरचेही मोठे क्षेत्र बाधित आहे. मामुर्डी आणि देहूरोडलाही रेड झोनचा फटका बसणार आहे.
तळवडेचे बहुतांश क्षेत्र रेड झोनमध्ये आहे. आताच्या उपमुख्यमंत्री अजित पवार हा प्रश्न रस्त्यांची नकाशात अधिक क्षेत्र बाधित होत आहे. याबाबत यांची भेट घेऊन मांडण्यात येईल. अनावश्यक आरक्षणे टाकण्यात आली आहेत. ती रद्द करावीत. - पंकज भालेकर, माजी नगरसेवक