निगडीतील सेतू केंद्राचा 'डेटा' गायब; कंत्राटदार बदलल्याचा जबर फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:13 IST2026-03-31T15:12:50+5:302026-03-31T15:13:41+5:30
- अपर तहसीलमध्ये दाखल्यांचा खोळंबा : १० मार्चपूर्वी अर्ज केलेल्या हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि शिष्यवृत्ती तसेच नोकरदारांचे कामकाज ठप्प; समस्यांचा सामना; प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

निगडीतील सेतू केंद्राचा 'डेटा' गायब; कंत्राटदार बदलल्याचा जबर फटका
पिंपरी : निगडी येथील अपर तहसील कार्यालयातील 'सेतू' केंद्रात कंत्राटदार बदलण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे हजारो दाखले रखडल्याचा प्रकार समोर आला आहे. जुन्या कंत्राटदाराने नवीन कंपनीला महत्त्वाचा जुना डेटा आणि 'लॉगिन आयडी' न दिल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असून, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सेतू केंद्र महसूल विभागाच्या अखत्यारीत आणि देखरेखीखाली कार्यरत आहे. येथे उत्पन्न, जात, रहिवासी (डोमिसाईल), राष्ट्रीयत्व यांसारखे अत्यावश्यक दाखले दिले जातात. हे दाखले शैक्षणिक प्रवेश, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात.
१० मार्चपर्यंत गुजरात इन्फोटेक लिमिटेड या कंपनीकडे या केंद्राचे कंत्राट होते. त्यानंतर जफायर लिमिटेड या नव्या कंपनीकडे कामकाज सोपविण्यात आले आहे. जुन्या कंपनीने १० मार्चपूर्वीचा सर्व डेटा तसेच लॉगिन आयडी हस्तांतरीत करावेत, अशा सूचना अपर तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिल्या होत्या. परंतु जुन्या गुजरात इन्फोटेक कंपनीने अद्याप जुना डेटा उपलब्ध करून न दिल्याने संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाली आहे. तहसीलदारांनी स्पष्ट सूचना दिल्या तरी त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी १० मार्चपूर्वी अर्ज केलेल्या हजारो दाखल्यांची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे.
परिसरातील आता अडचणी वाढल्या
- नागरिकांच्या वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या
-अर्जाची स्थिती समजत नाही
-मंजूर दाखलेही मिळत नाहीत
आर्थिक व शैक्षणिक नुकसान १० मार्चपूर्वी अर्ज केलेल्यांचे काय ?
सध्या नवीन कंत्राटदार कंपनीकडून १० मार्चनंतरचे दाखले देण्यास सुरुवात झाली असली तरी १० मार्चपूर्वी अर्ज केलेल्या नागरिकांचे काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जबाबदार कोण? नागरिकांचा सवाल
जुन्या कंत्राटदाराने डेटा का दिला नाही? प्रशासनाने वेळेत कारवाई का केली नाही? या सगळ्यास जबाबदार कोण, असे प्रश्न नागरिक विचारत आहेत. सर्व प्रकारामुळे सेतू केंद्राच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
...या दाखल्यांसाठी हेलपाटे
उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी (डोमिसाइल) दाखला, राष्ट्रीयता प्रमाणपत्र, वय, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, केंद्र सरकारचे जात प्रमाणपत्र, आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, स्थानिक वास्तव्याचा दाखला, महिला आरक्षण, ज्येष्ठ नागरिक दाखला.
ऑगस्ट महिन्यापूर्वीचे दाखले घेण्यासाठी लोक येत आहेत. मात्र, जुन्या कंत्राटदारांनी आम्हाला डेटा आणि लॉगिन आयडी दिला नसल्याने दाखले देता येत नाहीत. त्यामुळे १० मार्चपूर्वीच्या सर्व अर्जदारांचे दाखले वाटप करता येणार नाहीत. त्यांना नव्याने अर्ज करावे लागतील. - आकाश चंदनशिवे,सेतू व्यवस्थापक, जफायर लिमिटेड