गोळीबारातील विक्रांत ठाकूर,अमित पठारेला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:01 IST2025-11-15T17:00:18+5:302025-11-15T17:01:00+5:30
नितीन गिलबिलेची फॉर्च्युनर गाडीत बसवून जवळून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली

गोळीबारातील विक्रांत ठाकूर,अमित पठारेला अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
पिंपरी :पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी घडलेल्या नितीन गिलबिले हत्याकांड प्रकरणातील एक मुख्य आरोपी विक्रांत ठाकूर याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लोणावळ्यातील ॲम्बी व्हॅली परिसरातून तर अमित पठारेला वाघोली परिसरातून अटक केली.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिलेची फॉर्च्युनर गाडीत बसवून जवळून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्याला रस्त्यावर फेकून देत पायावरून गाडी घालून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, हत्येची क्रूरता पाहून परिसरात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात प्लॉटिंग आणि संपत्तीविषयक वादातून ही हत्या झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. ठाकूर, पठारे पोलिसांच्या ताब्यात आला आहे, त्यांच्या चौकशीतून या खुनामागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
कटकारस्थान लवकरच समोर येईल
प्राथमिक तपासात प्लॉटिंग आणि संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचे उघड झाले आहे. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली असून, हत्येचे नेमके कारण आणि त्यामागील संपूर्ण कटकारस्थान लवकरच समोर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये पोलिस उपायुक्त शिवाजी पवार, मारुती जगताप, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी स्वप्निल लांडगे, योगेश नागरगोजे, सुधीर डोळस आणि नितीन लवटे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.