‘रात्री फोनवर तूच होतास ना?’ म्हणत सुरक्षा रक्षकाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 20:21 IST2025-07-22T20:18:55+5:302025-07-22T20:21:02+5:30
‘रात्री फोनवर तूच होतास ना?’ असे म्हणत, संशयित महिलेने तिच्या हातातील फायबरच्या जाड पाइपने फिर्यादीच्या हातावर, खांद्यावर आणि पाठीवर मारून जखमी केले.

‘रात्री फोनवर तूच होतास ना?’ म्हणत सुरक्षा रक्षकाला मारहाण
पिंपरी : सोसायटीमध्ये सुरक्षा सुपरवायझरला दाम्पत्याने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २१) सकाळी नऊच्या सुमारास ताथवडेतील कोहिनूर सफायर-२ सोसायटीत घडली.
महेश जिजाराम शिंदे (५३, रा. अशोका हौसिंग सोसायटी, काळेवाडी फाटा, थेरगाव) असे जखमीचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २१ जुलै) याबाबत वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यंकटेश श्रीकर मराठे आणि त्याची पत्नी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश शिंदे कोहिनूर सफायर-२ सोसायटीतील आय-विंग क्लब हाऊस येथे फिरत होते. त्यावेळी डी/२०४ मध्ये राहणारे संशयित व्यंकटेश आणि त्याची पत्नी फिर्यादीजवळ आले. त्यांनी ‘रात्री फोनवर तूच होतास ना?’ असे म्हणत, संशयित महिलेने तिच्या हातातील फायबरच्या जाड पाइपने फिर्यादीच्या हातावर, खांद्यावर आणि पाठीवर मारून जखमी केले. तसेच, संशयित व्यंकटेश याने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.