दत्तक प्रक्रिया न करता खोटी माहिती देत दाम्पत्याने खरेदी केले बाळ; मिळवला जन्माचा दाखला
By नारायण बडगुजर | Updated: March 1, 2025 13:44 IST2025-03-01T13:41:31+5:302025-03-01T13:44:07+5:30
- बालकाची दत्तक प्रक्रियेबाबत कोणतही शासकीय नोंद न करता शासनाची दिशाभूल केली

दत्तक प्रक्रिया न करता खोटी माहिती देत दाम्पत्याने खरेदी केले बाळ; मिळवला जन्माचा दाखला
पिंपरी : स्वत:ला मूल होत नसल्याने दाम्पत्याने गर्भवती महिलेला पैसे दिले. खोटे नाव सांगून तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दत्तक प्रक्रिया न करता तिच्याकडून बाळ घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. देहूरोड येथे ही घटना उघडकीस आली.
मरविन डेविड वाझ (४५, रा. देहूरोड) याच्यासह त्याची पत्नी आणि अन्य एका फुलविक्रेत्या संशयित महिलेवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका महिलेने शुक्रवारी (दि. २८ फेब्रुवारी) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरविन आणि त्याच्या पत्नीला मूल होत नाही म्हणून त्यांनी फूल विक्रेत्या महिलेच्या ओळखीने गर्भवती महिलेला पैसे दिले. त्यानंतर तिला देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी गर्भवती महिलेची खरी ओळख लपवून तिला मरविनच्या पत्नीचे नाव देऊन रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर महिलेच्या बालकाची खोटी माहिती जन्म नोंदणीच्या घोषणापत्रामध्ये दिली.
त्यावर मरविन याने स्वत:चे नाव माेहित असे टाकले. तसेच बालकाची दत्तक प्रक्रियेबाबत कोणतही शासकीय नोंद न करता शासनाची दिशाभूल केली. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे बालकाची खोटी माहिती देऊन बालकाचा जन्माचा दाखला प्राप्त केला. कॅन्टोन्मेंट रुग्णालय प्रशासनाची फसवणूक करून बालक स्वत:चे आहे असे भासवून संबंधित महिलेला बाळाचे पैसे देऊन ते खरेदी करून स्व:च्या ताब्यात ठेवून घेतले.