हिंजवडीत कमांडोनी घेतला आयटी कंपनीवर ताबा; हेलिकॉप्टर उतरलं; काय आहे यामागचं कारण ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:15 IST2025-08-06T17:14:47+5:302025-08-06T17:15:50+5:30
- दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीत कमांडो आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि अशा संकटात नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल याचं प्रात्यक्षिक सादर करणं.

हिंजवडीत कमांडोनी घेतला आयटी कंपनीवर ताबा; हेलिकॉप्टर उतरलं; काय आहे यामागचं कारण ?
पुणे - हिंजवडी आयटी पार्कमधील एका अग्रगण्य आयटी कंपनीत आज राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG) कमांडोंनी दहशतवादविरोधी मॉक ड्रिल पार पाडलं. या विशेष सुरक्षा कवायतीदरम्यान एनएसजीच्या हेलिकॉप्टरचा वापर करत जीवंत आणि थरारक बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. या प्रकारच्या उच्चस्तरीय कवायतीमुळे परिसरात नागरिकांमध्ये उत्सुकता आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झालं आहे.
या मॉक ड्रिलचा उद्देश म्हणजे दहशतवादी हल्ल्याच्या संभाव्य परिस्थितीत कमांडो आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांची तयारी तपासणे आणि अशा संकटात नागरिकांचं संरक्षण कसं करता येईल याचं प्रात्यक्षिक सादर करणं. आयटी कंपनीवर हल्ला झाल्याची कल्पित परिस्थिती उभारून कमांडोंनी आत शिरून सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि बंदीस्त भागातून कर्मचाऱ्यांची सुटका कशी केली जाते, याचं वास्तवदर्शी चित्र उभं केलं.
दरम्यान, कंपनीच्या आवारात फक्त एनएसजीचं विशेष प्रशिक्षित पथक कार्यरत होतं, तर परिसरात स्थानिक पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. कुणालाही या परिसरात प्रवेश देण्यात आलेला नाही. संपूर्ण ऑपरेशन अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने राबवण्यात आलं. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे आणि कमांडोंच्या हालचालींमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये उत्सुकता वाढली. अनेकांनी या दृश्यांचे मोबाईलवर चित्रीकरण करत सोशल मीडियावर पोस्ट केलं. मात्र, प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचं आणि मॉक ड्रिलला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
प्रशासन सतर्क, संभाव्य संकटासाठी तयारी
या प्रकारच्या मॉक ड्रिलमुळे आयटी हबमध्ये दहशतवादविरोधी सज्जता कशी असावी, याचं उदाहरण पाहायला मिळालं. अशा कवायतीमुळे सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता वाढतेच, शिवाय नागरिकांमध्येही आपत्कालीन परिस्थितीबाबत जागरूकता निर्माण होते.