Pimpari-chinchwad : नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान नऊ वर्षे बंद

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 21, 2026 10:46 IST2026-03-21T10:44:58+5:302026-03-21T10:46:00+5:30

- उन्हाळी सुटीच्या तोंडावर कासवगती कामावरून नागरिकांचा संताप; महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारांना मुदतवाढीचे 'बक्षीस'; तिसऱ्या टप्प्यातील सुमारे १४ कोटीचे काम मुदतीनंतरही सुरूच

pimpari-chinchwad Closed for nine years; Crores spent on renovations, yet Bahinabai Serpodyan remains closed | Pimpari-chinchwad : नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान नऊ वर्षे बंद

Pimpari-chinchwad : नूतनीकरणावर कोट्यवधी खर्च, तरीही बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान नऊ वर्षे बंद

पिंपरी : बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणीसंग्रहालय येथील सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम २०१७ पासून सुरू आहे. आजपर्यंत प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंदच आहे. तब्बल नऊ वर्षे उलटूनही काम पूर्ण न झाल्याने महापालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या सात वर्षांपासून काम कासवगतीने सुरू आहे. कामास विलंब होऊनही संबंधित ठेकेदार, सल्लागार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांनाच वारंवार मुदतवाढ देण्याचा अजब प्रकार महापालिका प्रशासनाने केला आहे. सध्या तिसऱ्या टप्प्यातील सुमारे १४ कोटी रुपयांचे काम सुरू असून, त्याची मूळ मुदत सहा महिन्यांची होती. मात्र, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून वेळेत परवानगी मिळत नसल्याचे कारण देत ठेकेदाराला पुन्हा वाढीव मुदत दिली. त्यामुळे प्राणीसंग्रहालय कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

प्राणीसंग्रहालय कधी सुरू होईल, अधिकारीही निरूत्तर

तिसऱ्या टप्प्याची निविदा डिसेंबर २०२४ मध्ये काढली होती. नियोजनानुसार जुलै २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन उद्यान खुले होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात काम रखडल्याने आता नवा मुहूर्त जाहीर करण्याची वेळ आली आहे. “प्राणीसंग्रहालय नेमके कधी सुरू होईल?” याचे उत्तर अधिकाऱ्यांकडेही नसल्याचे चित्र आहे.

३६ प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू

प्राणीसंग्रहालय बंद असले तरी तेथे प्राणी, पक्षी व सर्प ठेवण्यात आले आहेत. गेल्या सहा वर्षांत ७ मोर, ६ मगर, ४ कासव, ५ साप, ५ घुबड यांसह विविध प्रजातींच्या एकूण ३६ प्राणी व पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. औंध येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयाने हे मृत्यू नैसर्गिक व आजारपणामुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या येथे १८४ प्राणी, पक्षी व सर्प आहेत. या प्रकरणाने राज्याच्या अधिवेशनातही जोरदार चर्चा रंगली. “सात वर्षांत काम पूर्ण झाले नाही, २१ कोटी खर्च होऊनही परिसराची अवस्था दयनीय आहे,” अशी टीका करण्यात आली. झाडीझुडपे, राडारोडा आणि निष्काळजी कारभारामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचेही मत व्यक्त झाले. माजी आमदार अश्विनी जगताप यांनी हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. 

प्राणीसंग्रहालय हस्तांतरित करणार

प्राणीसंग्रहालयाचा कारभार वनविकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर संचालन त्या महामंडळामार्फत करण्यात येणार असून, पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. 

काम टप्प्याटप्प्याने सुरू असून बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. मात्र, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार आवश्यक बदल केल्यानंतरच प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी खुले करण्यात येईल.  - मनोज सेठीया, सहशहर अभियंता

Web Title : पिंपरी-चिंचवड चिड़ियाघर: करोड़ों खर्च, बहिणाबाई चिड़ियाघर नौ वर्षों से बंद

Web Summary : पिंपरी-चिंचवड का बहिणाबाई चौधरी चिड़ियाघर नवीनीकरण पर करोड़ों खर्च के बावजूद नौ वर्षों से बंद है। देरी, विस्तारित समय सीमा और 36 जानवरों की मौत से आलोचना। वन निगम को हस्तांतरण की योजना।

Web Title : Pimpri-Chinchwad Zoo: Crores Spent, Bahinabai Zoo Shut for Nine Years

Web Summary : Pimpri-Chinchwad's Bahinabai Chaudhary Zoo remains closed for nine years despite crores spent on renovation. Delays, extended deadlines, and 36 animal deaths spark criticism. Transfer to forest corporation planned.