चावसरला पाण्यासाठी होतेय भटकंती; पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:07 IST2025-04-12T12:05:39+5:302025-04-12T12:07:07+5:30
मावळातील अतिदुर्गम गावातील ग्रामस्थांच्या घशाला कोरड : पवना धरण उशाला असूनही पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट, पाणीपुरवठा विस्कळीत, ग्रामस्थ संतप्त

चावसरला पाण्यासाठी होतेय भटकंती; पंचायत समितीवर महिलांचा हंडा मोर्चा
-सचिन ठाकर
पवनानगर : मावळ तालुक्यातील अतिदुर्गम चावसर गावाच्या ग्रामस्थांना धरण उशाला असतानाही हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. गावातील पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याने भर ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
या समस्येला कंटाळून संतप्त महिलांनी थेट मावळ पंचायत समितीवर मोर्चा काढत गटविकास अधिकारी आणि पाणीपुरवठा विभागाला निवेदन दिले. योजना गेल्या पाच महिन्यांपासून विस्कळीत आहे. ग्रामस्थांना विशेषतः महिलांना कैक किलोमीटर अंतर पार करून डोक्यावर हंडा भरून पाणी आणावे लागते. त्यामुळे महिलांनी मावळ पंचायत समितीवर हंडे घेऊन मोर्चा काढत संताप व्यक्त केला.
महिलांनी ग्रामसेवक व पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करत गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली. चावसर गावाला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. गेल्या दीड वर्षापूर्वी जलजीवन योजनेतून स्वतंत्र पाणीपुरवठा योजना करण्यात आली. मात्र, ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाली नाही.
आम्ही आता सत्तरी गाठली तरी आम्हाला पाणी नाही, एक हंडा भरून आणायला दोन तास लागतात, आम्ही या वयात काय करायचे? घरात वापरायला पाणी लागतेच.
लीलाबाई गोणते, महिला ग्रामस्थ
आमच्या जागा धरणात गेल्या; पण आम्हालाच पाणी मिळत नाही. आमच्या गावात पुढारी फक्त मत मागायला येतात, चार महिने झाले पाणी नाही. पुढारी झोपले आहे का? - लक्ष्मीबाई गोणते, महिला ग्रामस्थ
ग्रामसेवक व प्रशासक यांनी पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे, २४ तासांत पाणीपुरवठा सुरळीत होईल. - कुलदीप प्रधान, गटविकास अधिकारी.
गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येईल.
- संतोष बोंद्रे, ग्रामसेवक, केवरे-चावसर ग्रुप ग्रामपंचायतग्रामसेवक, पाणीपुरवठा कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. खासगी बंगल्यांना रात्री पाणीपुरवठा होतो. मात्र, ग्रामस्थांना मोटार बिघडल्याचे सांगितले जाते.- मारुती गोणते, ग्रामस्थ, चावसर