आश्चर्यच..! ११ तलाठी कार्यालयांतून चालतोय तब्बल ३१ सजांचा कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:46 IST2025-06-12T12:45:20+5:302025-06-12T12:46:21+5:30

- रहाटणी, देहू व भोसरी सजात तीन तलाठी, चऱ्होली सजात चार तलाठी व किवळे सजात सहा तलाठी बसत असल्याने जागा अपुरी पडत आहे

pimpari-chinchwad As many as 31 prisons are being run from 11 Talathi offices. Out of thirty-one, two Talathi offices are in government premises. | आश्चर्यच..! ११ तलाठी कार्यालयांतून चालतोय तब्बल ३१ सजांचा कारभार

आश्चर्यच..! ११ तलाठी कार्यालयांतून चालतोय तब्बल ३१ सजांचा कारभार

- रवींद्र जगधने

पिंपरी :
पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच मंडळ अधिकारी कार्यालयांपैकी दोनच कार्यालये शासकीय जागेवर आहेत. तर ३१ तलाठी (सजा) कार्यालयांपैकी पिंपळे वाघेरे व किवळे ही दोनच कार्यालये शासकीय जागेत आहेत. तर ३१ सजांचे कामकाज ११ कार्यालयांतून चालते. २० सजांना सध्या कार्यालय नाही. त्यामुळे त्यांचे कामकाज इतर कार्यालयांतून चालते. एका सजामध्ये दोन ते सहा तलाठ्यांचे दफ्तर आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत अगोदर भोसरी व चिंचवड ही दोनच मंडळ व नऊ तलाठी कार्यालये होती. मात्र, नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने निगडी, देहू व मोशी अशी तीन मंडळ अधिकारी कार्यालये आणि २२ तलाठी कार्यालयांची निर्मिती केली. मात्र, अगोदर या कार्यालयांसाठी तलाठी नव्हते. नवीन तलाठी भरतीमध्ये देहू येथील विठ्ठलनगर तलाठी कार्यालय वगळता २१ तलाठी मिळाले आहेत. मात्र, त्यांना बसण्यासाठी कार्यालयच नसल्याने तहसील कार्यालयाकडून कार्यालयांसाठी जागांची शोधाशोध सुरू आहे. अकरापैकी नऊ तलाठी कार्यालयांचा कारभार भाड्याच्या जागेतून सुरू आहे. 

नागरिकांची होतेय गैरसोय

रहाटणी, देहू व भोसरी सजात तीन तलाठी, चऱ्होली सजात चार तलाठी व किवळे सजात सहा तलाठी बसत असल्याने जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे तलाठी व कर्मचाऱ्यांनाच बसण्यासाठीही पुरेशी जागा नाही, त्यामुळे नागरिकांना उभे राहण्यासही जागा नसते. परिणामी, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

मूळ सजा कार्यालय - कार्यालय उपलब्ध नसलेल्या सुरू सजा

चिंचवड - आकुर्डी

रहाटणी - पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर

किवळे - निगडी, किन्हई, चिंचोली, रावेत, मामुर्डी

देहू - माळीनगर, विठ्ठलनगर

चिखली - तळवडे

भोसरी १ - भोसरी २, दापोडी

सांगवी - पिंपळे निलख

दिघी - बोपखेल

मोशी - डुडूळगाव, बोऱ्हाडेवाडी

चऱ्होली - निरगुडी, चोविसावाडी, वडमुखवाडी

 तीस सजांसाठी तलाठी शासनाकडून मिळाले आहेत. मात्र, काही सजांना कार्यालये उपलब्ध झालेली नाहीत. सात सजांच्या जागेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत.  - जयराज देशमुख, अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड

Web Title: pimpari-chinchwad As many as 31 prisons are being run from 11 Talathi offices. Out of thirty-one, two Talathi offices are in government premises.