चिखली परिसरात स्पाईन रस्ता बनतोय अपघाताचा 'हॉट स्पॉट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:34 IST2026-02-12T16:32:53+5:302026-02-12T16:34:04+5:30
- खड्डे व नादुरुस्त रस्त्यामुळे पाच दिवसांत दोन अपघात; दोन्ही अपघातांनंतर संबंधित वाहनांमधील इंधन, ऑईल रस्त्यावर सांडले, नागरिकांची अग्निशमन दलाला माहिती देत पुढील धोका टाळला

चिखली परिसरात स्पाईन रस्ता बनतोय अपघाताचा 'हॉट स्पॉट'
- रामहरी केदार
चिखली : घरकुल चौकापासून काही अंतरावर खासगी बस क्रमांक (एमएच-१२, एफझेड- ८०८७) सोमवारी (दि. १०) सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. बस खड्ड्यात आदळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला घसरत जाऊन झाडावर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. यापूर्वी गुरुवारी (दि. ५) सकाळी याच ठिकाणी, घरकुल चौक परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अवजड वाहन उलटले होते.
त्या अपघातातही सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. कृष्णानगर चौक ते घरकुल चौकदरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असून, रस्ता समतल नसल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. खड्डे नजरेस न पडल्याने वाहने आदळतात, चालक गोंधळून जातात आणि नियंत्रण सुटुन अपघात घडतात.
'वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे'
या रस्त्यावर अपघात वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी टिप्पर पलटी झाला होता आणि आज पुन्हा अपघात घडला. दोन्ही अपघातांची वर्दी आमच्याच पथकाकडून देण्यात आली. वाहनचालकांनीही शिस्त पाळून वेगावर नियंत्रण ठेवावे, दिनेश येलवे, अग्निशमन दल वाहनचालक यांनी सांगितले.
कृष्णानगर चौक ते घरकुल चौक या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल.- अभिमान भोसले, कार्यकारी अभियंता, बीआरटी प्रकल्प विभाग
रस्ता समतल नाही. अचानक खड्डे नजरेस न पडल्याने वाहन आदळते, चालक गोंधळतात व नियंत्रण सुटते. -रघुनाथ बेरगळ, वाहनचालक
स्पाईन रोड अपघातांचा 'हॉटस्पॉट' बनत असूनही बीआरटी प्रकल्प विभाग व महापालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. अवघ्या पाच दिवसांत मोठ्या वाहनांचे दोन अपघात झाले आहेत. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. - शांताराम खुडे, प्रत्यक्षदर्शी, नागरिक