RTE admissions: पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा..., १७२ शाळांमध्ये होणार आरटीईचे प्रवेश
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: April 7, 2023 18:11 IST2023-04-07T18:10:18+5:302023-04-07T18:11:17+5:30
शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा आर्थिक दुर्बंल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात

RTE admissions: पालकांनो, कागदपत्रे तयार ठेवा..., १७२ शाळांमध्ये होणार आरटीईचे प्रवेश
पिंपरी: आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यासाठी बुधवारी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुषंगाने निवड यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रवेशासाठी निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजतापासून मेसेज पाठविले जाणार आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा आर्थिक दुर्बंल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. शहरातील १७२ शाळांनी आरटीईतंर्गत नोंदणी केली. या शाळांमध्ये रिक्त जागांवर पात्र बालकांना प्रवेश देण्यासाठी २५ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत गरजूंनी अर्ज केले आहेत. त्यातील निवडीसाठी पात्र ठरलेल्या अर्जाची सोडत जाहीर करण्यात आली.
मेसेजवर अवलंबून राहू नये...
आरटीईतंर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या पात्र बालकांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. पात्र ठरलेल्या बालकांच्या पाल्यांना प्रवेशाबाबत संदेश प्राप्त होणार आहेत. मात्र, बालकांनी केवळ संदेशावर अवलंबून न राहता संकेतस्थळावर भेट देऊन निवड यादीपाहून प्रवेशाची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले.
ही कागदपत्रे आवश्यक...
मोफत प्रवेशासाठी अनेक महत्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रहिवासी पुरावा, जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जन्माचा दाखला, ओळखीचा पुरावा, बालक अनाथ असल्यास कागदपत्रे असे काही इतर कागदपत्र प्रवेशावेळी आवश्यक आहेत.