चिखलीसह परिसरात अन्य पास केंद्र बंद;विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:46 IST2025-08-07T15:46:04+5:302025-08-07T15:46:23+5:30

- निगडी पास केंद्रावर अतिरिक्त ताण येत असल्याने कर्मचारी हैराण, केंद्रावर पास काढण्यासाठी तळवडे, निघोजे, मोई, रावेत, पुनावळेतील प्रवाशांची गर्दी, वाढीव काउंटर सुरू करावे अशी मागणी

Other pass centers in Chikhali and other areas closed; students, senior citizens in distress | चिखलीसह परिसरात अन्य पास केंद्र बंद;विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल

चिखलीसह परिसरात अन्य पास केंद्र बंद;विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल

- रामहरी केदार

चिखली :
शहरातील नागरिकांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका निभावणारी म्हणून ‘पीएमपी’चा उल्लेख केला जातो. दररोज लाखो नागरिक आपली उपजीविका भागवण्यासाठी ‘पीएमपी’च्या प्रवासाचा आधार घेतात. मात्र, चिखलीसह शहरातील इतर ठिकाणी असलेले पास केंद्र नियमित सुरू नसल्याने विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

चिखली येथून दररोज शहरातील विविध ठिकाणी ‘पीएमपी’ बसच्या १२९ फेऱ्या होतात. या बसमधून हजारो प्रवासी, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करावा लागतो. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीसह उत्तम सेवा मिळावी म्हणून ‘पीएमपी’ प्रशासनाकडून पास सुविधा राबवली जाते. मात्र, पास केंद्र बंद असल्याने प्रवाशांना नाहक मानसिक त्रासासह अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.


चिखलीसह इतरही पास केंद्र नियमित सुरू नसल्याने निगडी पास केंद्रावर चिखली, तळवडे, निघोजे, मोई, रावेत, पुनावळे या परिसरातील प्रवासी पास काढण्यासाठी निगडी केंद्रावर गर्दी करतात. त्यामुळे येथील केंद्रावर अतिरिक्त ताण येत असल्याचे पीएमपीएल पास केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. इतर ठिकाणची पास केंद्र सुरू करावीत व निगडी पास केंद्रावर वाढीव काउंटर सुरू करावे, अशी मागणी प्रवासी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

आमच्याकडे मनुष्यबळ कमी होते म्हणून चिखली येथील पास केंद्र आठवड्यातील दोन दिवस सुरू असायचे. सध्या मनुष्यबळ वाढले असून लवकरच चिखलीसह इतर ठिकाणी असलेली पास केंद्र नियमित सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. - विकास मते, पीएमपी, पास विभागप्रमुख

 
चिखली येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता पीएमपीएल प्रशासनाने चिखली येथील पास केंद्र नियमित सुरू ठेवावे. अनेक ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना पास मिळवण्यासाठी निगडीतील पास केंद्रावर तासनतास ताटकळत थांबावे लागते. - विनायक मोरे, सामाजिक कार्यकर्ते, चिखली

Web Title: Other pass centers in Chikhali and other areas closed; students, senior citizens in distress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.