जमीन मोजणीला विरोध करत म्हणाले, अडवले तर रक्त सांडेल! कोयत्याचा धाक दाखवून धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 12:55 IST2023-12-18T12:55:00+5:302023-12-18T12:55:32+5:30
कासारवाई येथे शनिवारी (दि. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली....

जमीन मोजणीला विरोध करत म्हणाले, अडवले तर रक्त सांडेल! कोयत्याचा धाक दाखवून धमकी
पिंपरी : जमिनीची मोजणी करण्यासाठी प्रतिकार केल्याने पाच जणांनी मिळून तिघांना कोयत्याचा धाक दाखवला. आमची अडवणूक केली तर येथे रक्त सांडेल, असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. कासारवाई येथे शनिवारी (दि. १६) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.
शब्बीरभाई करीमभाई मुलाणी (५९, रा. कासारसाई, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित असलेल्या सूरज लोखंडे आणि अन्य चार जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारसाई येथे फिर्यादी मुलाणी यांच्या मालकीची जमीन असून संशयित तिथे येऊन फिर्यादी मुलाणी यांच्या मालकीची जमीन मोजू लागले. तेव्हा फिर्यादी मुलाणी व त्यांच्या दोन भावांनी संशयितांना प्रतिकार केला. त्यावरून संशयित सूरज लोखंडे याने फिर्यादी मुलाणी यांना कोयत्याचा धाक दाखवला. आम्ही जमीन विकत घेतली आहे. आम्हाला जमिनीचा ताबा घ्यायचा आहे. आमची अडवणूक केली तर इथे रक्त सांडेल, अशी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच जिवे ठार मारण्याचीही धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.