Dange chowk-Chinchwad Road : दत्तनगर रस्त्यावर पुन्हा ऑइल गळती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 17:53 IST2024-12-31T17:51:34+5:302024-12-31T17:53:17+5:30
स्थानिक युवकांचे प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला

Dange chowk-Chinchwad Road : दत्तनगर रस्त्यावर पुन्हा ऑइल गळती
हिंजवडी : अत्यंत वर्दळीच्या अशा डांगेचौक-चिंचवड रस्त्यावरील दत्तनगर येथे पुन्हा ऑइल गळती झाली. रात्रीच्या अंधारात रस्त्यावर पडलेल्या ऑइलचा अंदाज येत नसल्याने त्यावरून अनेक दुचाकीस्वार घसरले. मात्र, स्थानिक युवकांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील मोठा अनर्थ टळला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
सोमवारी (दि. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास चिंचवडच्या दिशेला जाणाऱ्या एका अज्ञात वाहनामधून दत्तनगर ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑइल गळती झाली. दुचाकीस्वार घसरून पडू लागल्याने ही बाब स्थानिक युवकांच्या लक्षात आली. तत्काळ वाहतुकीचे योग्य नियोजन करत स्थानिकांनी वाहनचालकांना सावध केल्याने पुढील अपघात टळले. त्यानंतर थेरगाव अग्निशमन दलाला माहिती कळवून उपस्थित युवकांनी दुभाजकामधील माती सांडलेल्या ऑइलवर टाकली.
दरम्यान, डांगेचौकसारख्या वर्दळीच्या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या ऑइल गळतीमुळे वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. यापूर्वीसुद्धा डांगेचौक परिसरात अनेकवेळा रस्त्यावर ऑइल गळती झाल्याने अपघात झाले आहेत.
वाहतूक पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कार्यवाही करणे गरजेचे आहे. दत्तनगर या ठिकाणी झालेल्या ऑइल गळतीवेळी विलास येळवंडे, अशोक धुमाळ, अनिल घोडेकर, कुणाल तारू, मुसवीर सोंडे, गणेश तिकोने, अमोल पाटील, रमेश भोंडवे, आर्यन पवार, अथर्व धुमाळ यांनी प्रसंगावधान दाखवत सहकार्य केले.