पर्यटनाची चिंता मिटली, आता एसटी देणार ‘पॅकेज टूर’; खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 21:15 IST2022-11-16T21:10:26+5:302022-11-16T21:15:02+5:30
या सेवेमध्ये एक दिवसाच्या मुक्कामाचीही सोयही असणार आहे...

पर्यटनाची चिंता मिटली, आता एसटी देणार ‘पॅकेज टूर’; खासगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत कमी दर
पिंपरी : पर्यटनाचा हंगाम आता सुरू झाला. ग्रुपने आणि जुने मित्र असे मिळून खासगी गाड्या बुक करून महाबळेश्वर, हरिहरेश्वर, अलिबाग, माथेरान आदी ठिकाणी पर्यटनाला जात आहेत. मात्र, खासगी गाड्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे पर्यटनाला जाणाऱ्या अनेकांचा भ्रमनिरास होतो. अशा परिस्थितीमध्ये एसटी विभागाकडून परवडेल अशा दरात हव्या त्या पर्यटनस्थळी जाण्यासाठी ‘पॅकेज टूर’ची सुविधा उपलब्ध केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून ही सेवा दिली जात आहे.
कोविडच्या कालावधीनंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. पूर्वीपेक्षा आता पर्यटनाला जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या संधीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स तसेच खासगी वाहनचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारून पर्यटनस्थळाचे दर्शन घडवले जाते. मात्र, या दरापेक्षा कमी दरामध्ये एसटीकडून ‘पॅकेज टूर’ देण्यात येणार आहे.
३० ते ४० जणांची आवश्यकता
एसटीच्या ‘पॅकेज टूर’साठी प्रवाशांची एसटी बस बुक करावी लागणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी ३० ते ४० जणांचा मोठा ग्रुप असणे आवश्यक आहे. या प्रवाशांच्या ग्रुपने एसटी बस बुक केल्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाण्याची आणि आणण्याची सुविधा ‘एसटी’कडून दिली जाणार आहे. मात्र, ‘पॅकेज टूर’साठी महामंडळाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रवासी पर्यटकांची संख्या आवश्यक आहे.