सलाम ! निगडीत पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन ; झोपडपट्ट्यांमध्ये केले साहित्य वाटप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:00 PM2020-03-26T13:00:54+5:302020-03-26T13:08:05+5:30

किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांनी काठ्या बाजूला ठेवत दंडुकशाहीऐवजी माणुसकीचे दर्शन घडविले आहे

Nigdi police distributes daily need materials in slums | सलाम ! निगडीत पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन ; झोपडपट्ट्यांमध्ये केले साहित्य वाटप 

सलाम ! निगडीत पोलिसांकडून माणुसकीचे दर्शन ; झोपडपट्ट्यांमध्ये केले साहित्य वाटप 

googlenewsNext

पिंपरी : किराणा तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या अनेक नागरिकांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र पिंपरी-चिंचवड येथे पोलिसांनी काठ्या बाजूला ठेवत दंडुकशाहीऐवजी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांसह झोपडपट्टीतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याज संचारबंदी तर देशभरात लॉक डाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. घराबाहेर पडणा-या नागरिकांना पोलिसांकडून चोप देण्यात येत आहे. काही ठिकाणी पोलिसांकडून पोलिसांनाच मारहाण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पोलिसांच्या या दंडुकेशाहीमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट आहे. तसेच हातावर पोट असलेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निगडी पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या प्राधिकरण पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख त्यांच्या घरासाठी किराणा साहित्य खरेदी करीत होते. त्यावेळी झोपडपट्टीतील एक वृद्ध महिला तेथून जात होती. घराबाहेर पडण्याचे कारण शेख यांनी विचारले. माझ्या घरातील राशन संपले असून उसने पैसे घेण्यासाठी जात आहे, असे महिलेने सांगितले. तसेच त्याचवेळी एक तृतीयपंथी देखील तेथून जात असताना त्यांनी त्याच्याकडेही विचारपूस केली. त्यावेळी त्याच्याकडील धान्य व पैसे संपल्याचे त्याने सांगितले. तसेच झोपडपट्टीतील प्रत्येक कुटुंबाची हीच परिस्थिती असल्याचे समोर आले. त्यामुळे शेख यांनी त्यांना मदतीचा हात दिला.

गहू, तांदूळ, तेल, टुथपेस्ट, ब्रश, पीठ, साखर, चहापावडर, साबण आदी साहित्याचे एक किट तयार करून घेतले. प्राधिकरण पोलीस चौकीजवळील झोपडपट्टीतील 35 कुटुंबांना शेख यांनी किराणा साहित्य दिले. त्यामुळे या झोपडपट्टीतील नागरिकांना दिलासा मिळाला असून, महामारीच्या संकटात पोलिसांतील माणसाचे व माणुसकीचे दर्शन घडले.

Web Title: Nigdi police distributes daily need materials in slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.