NCP corporator Javed Sheikh passes away | राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरीत पुन्हा एकदा हादरा,महिन्याभरातच दुसरा नगरसेवक गमावला!

राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरीत पुन्हा एकदा हादरा,महिन्याभरातच दुसरा नगरसेवक गमावला!

ठळक मुद्देशेख यांची पहिली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर दुसरी निगेटिव्ह

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आकुर्डी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख (वय ५९) यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. महिनाभरात कोरोनामुळे नगरसेवकांचा मृत्यू होण्याची दुसरी घटना आहे. कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर शेख यांचे निधन झाल्याचे महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
       आकुर्डी प्रभागातून जावेद शेख सलग तीन वेळा ते निवडून आले होते. २००७ च्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत  राष्ट्रवादीकडून शेख यांनी निवडणूक लढविली होती. त्यातही विजयी झाले. तसेच ‘अ’ प्रभागाचे अध्यक्षपदही भूषविले होते.  
शेख यांना १६ जुलै रोजी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलविले होते. उपचारादरम्यान त्यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. महिनाभरापूर्वी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा कोरोनाने बळी घेतला होता. त्यानंतर महिनाभरातच दुसऱ्या नगरसेवकाचा मृत्यू झाल्याने राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे.
डॉ. पवन साळवे म्हणाले, जावेद शेख यांचा कोरोना अहवाल १५ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दखल केले होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने शेख यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची पुन्हा कोरोना चाचणी केली असता ३० जुलैला अहवाल निगेटिव्ह आला होता.

Web Title: NCP corporator Javed Sheikh passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.