घरावर दगड मारल्याचा जाब विचारल्यानं एकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 19:57 IST2021-09-20T16:52:33+5:302021-09-20T19:57:44+5:30
तीन अल्पवयीनांसह पाच जणांवर गुन्हा : दोघांना अटक

घरावर दगड मारल्याचा जाब विचारल्यानं एकाचा खून
पिंपरी : भांडण सोडविल्याच्या कारणावरून घरावर दगड मारले. त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून कपाळावर सिमेंट गट्टूने जोरात फटका मारून एकाचा खून केला. अण्णा भाऊ साठे वसाहत, निगडी येथे सोमवारी (दि. २०) मध्यरात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली.
संपत भीमराव गायकवाड (वय ४५, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत चाळ, निगडी), असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी संध्या संपत गायकवाड (वय ३६) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, वैभव उर्फ बिचू संतोष अडागळे, संतोष अडागळे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, ओटास्कीम, निगडी) यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वैभव अडागळे व संतोष अडागळे यांना पोलिसांनीअटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व काही मुलांमध्ये भांडण झाले होते. ते भांडण मयत संपत गायकवाड यांनी सोडविले होते. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी संपत गायकवाड यांच्या घरावर दगडफेक केली. तुम्ही आमच्या घरावर दगड का मारले, असा जाब गायकवाड यांनी आरोपींना विचारला. त्यामुळे आरोपींना गायकवाड यांच्याबाबत राग होता. सोमवारी मध्यरात्री गायकवाड आणि आरोपींमध्ये पुन्हा किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी आरोपींनी संगनमत करून गायकवाड यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच गायकवाड यांच्या कपाळावर सिमेंट गट्टूने जोरात फटका मारून गायकवाड यांना जखमी केले. यात गायकवाड यांचा मृत्यू झाला.