भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत एकाचा खून; आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 19:12 IST2022-06-27T19:12:44+5:302022-06-27T19:12:59+5:30
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

भांडणाच्या रागातून कोयत्याने वार करत एकाचा खून; आरोपी फरार
पिंपरी : भांडणाच्या कारणावरून टोळक्याने कोयत्याने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. २६) रात्री आठच्या सुमारास बावधन येथे घडली. पितबसा कमलचंद जानी (वय ५७, रा. गंगा लिजंड लेबर कॅम्प, बावधन. मूळ रा. ओडिसा) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उपेंद्र पितबसा जानी (वय १७) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे उर्फ कळवा, आकाश पवार उर्फ चेल्या आणि इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पितबसा आणि आरोपींचे शनिवारी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी रविवारी पितबसा यांच्या घराजवळ जाऊन कोयत्यासारख्या धारदार हत्याराने डोक्यात आणि हातावर सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने पितबसा यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.