छटपूजेसाठी सुट्टी दिली नाही म्हणून केला ठेकेदाराचा खून; उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 19:44 IST2020-12-04T19:44:00+5:302020-12-04T19:44:17+5:30
ठेकेदारासोबत राहणाऱ्या आरोपीनेच खून केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली..

छटपूजेसाठी सुट्टी दिली नाही म्हणून केला ठेकेदाराचा खून; उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक
पिंपरी : ठेकेदाराने छट पुजेसाठी सुट्टी दिली नाही म्हणून त्याचा खून करणाऱ्यास हिंजवडी पोलिसांनी आरोपीस उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. अरविंद नैपाल चौहान उर्फ यादव (वय ३५, मूळ रा. देवरीकलान, ता. मडीहान, जि. मिर्झापूर, उत्तरप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
गणपत सदाशिव सांगळे (वय २४, रा. जांभे, ता. मुळशी) यांचा २४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घरमालक सुरेश मोहिते यांच्यासोबत घराची पाहणी केली. या ठेकेदारासोबत राहणाऱ्या अरविंद चौहान याने खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली. त्यानुसार चौहान पोलिसांनी याचा शोध सुरु केला असता तो आपल्या मूळ गावी गेल्याचे समजले. त्यानुसार हिंजवडी पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात गेले. या पथकाने तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास केला. स्थानिक पोलिसांच्या मदतीने नक्षलग्रस्त आणि जंगल परिसरातून प्रवास केला. वेषांतर करुन आरोपीचा पत्ता शोधून काढला. आरोपी पत्नीसह तेथूनही पळून जाण्याच्या तयारीत होता. तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले, पोलीस अंमलदार बंडू मारणे, महेश वायबसे, सुभाष गुरव, नूतन कोंडे, झनक गुमलाडू यांच्या पथकाने ही कारवाई केली.