मुदतबाह्य पाच लाखांची औषधे महापालिका करणार नष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:37 IST2025-01-15T11:36:32+5:302025-01-15T11:37:17+5:30
४५ प्रकारची औषधे व सर्जिकल साहित्य मुदतबाह्य झाली आहेत.

मुदतबाह्य पाच लाखांची औषधे महापालिका करणार नष्ट
पिंपरी : कोरोना महामारीत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने मोठ्या प्रमाणात औषधे वापरात न आल्याने मुदतबाह्य अशी विविध ४५ प्रकारची पाच लाख रुपये किमतीची औषधे नष्ट केली जाणार आहेत.
महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात कोरोना सेंटर सुरू करण्यात आले होते. रुग्णालयात रुग्णांवरील उपचारांसाठी औषधांचा साठा करून ठेवला होता. त्याचा वापर न झाल्याने तसेच, आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उपचारात वेळोवेळी बदल करण्यात आल्याने औषधे भांडारात वापराविना पडून होती. अशी ४५ प्रकारची औषधे व सर्जिकल साहित्य मुदतबाह्य झाली आहेत.
त्या औषधांच्या किमती ४ लाख ९० हजार ४७४ रुपये इतकी आहे. वापराअभावी औषधे मुदतबाह्य झाल्याने ती नष्ट करण्यात येणार आहेत. जैव वैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार त्या औषधांची विल्हेवाट लावली जाणार आहे. त्यास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली.