पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाचा निर्णय लांबणीवर ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 14:16 IST2025-05-11T14:14:41+5:302025-05-11T14:16:19+5:30
महापालिकेच्या निवडणुका आगामी चार महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग येणे अपेक्षित होते.

पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाचा निर्णय लांबणीवर ?
पिंपरी : पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्ष पदाचा निर्णय काही दिवसांसाठी लांबणीवर पडला असल्याचे संकेत राजकीय गोटातून मिळाले आहे. त्यामुळे शनिवारी (दि. १०) याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता मावळली आहे.
महापालिकेच्या निवडणुका आगामी चार महिन्यांमध्ये घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग येणे अपेक्षित होते. यापूर्वी ५ तारखेपर्यंत अध्यक्षपदाचा निर्णय जाहीर केला जाणार होता. मात्र, हा निर्णय पाच दिवसांसाठी म्हणजे १० तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, आता शनिवारी (दि. १०) याबाबत निर्णय होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या देशातील युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता याबाबत काही दिवसांनी निर्णय घेतला जाण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदासाठी मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात २८ एप्रिल रोजी २६ पदाधिकाऱ्यांनी गुप्त मतदान केले. पर्यवेक्षक तथा आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश चिटणीस तथा निवडणूक अधिकारी वर्षा डहाळे यांच्या उपस्थितीत हे मतदान झाले. याबाबतचा बंद लिफाफ्यातील अहवाल प्रदेश भाजपकडे सादर केल्यानंतर शहराध्यक्ष पदाचे नाव जाहीर करण्याचे नियोजन होते. भाजप शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जुन्या नव्या व पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड चुरस आहे.
हे आहेत इच्छुक...
शहराध्यक्षपदासाठी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विलास मडिगेरी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे, संजय मंगोडेकर, विजय फुगे, संतोष कलाटे, शैला मोळक, सुजाता पालांडे आदी प्रमुख इच्छुक आहेत.