घरात बंद पडलेली लाईट दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 13:28 IST2021-07-27T13:28:45+5:302021-07-27T13:28:51+5:30
काठीचा धाक दाखवून फिर्यादीला आरोपी त्याच्या घरी घेऊन गेला. घराची बंद पडलेली लाईट कर्मचाऱ्याकडून दुरुस्त करून घेतली.

घरात बंद पडलेली लाईट दुरुस्त करून घेण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण
पिंपरी : महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून जखमी केले. त्यानंतर धाक दाखवून घरी नेऊन बंद पडलेली लाईट कर्मचाऱ्याकडून दुरुस्त करून घेतली. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आंबी, ता. मावळ येथे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.
प्रवीण मधुकर जांभुळकर (वय ४४, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २६) फिर्याद दिली. प्रकाश दरेकर (वय ४०, रा. आंबी, ता. मावळ), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जांभुळकर हे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ट्रांसफार्मरचा डिओ फ्यूजची पाहणी करण्यासाठी ते दुचाकीवरून जात होते. त्यावेळी दरकरने त्यांना अडवले. ट्रांसफार्मरकडे जाण्यास अडथळा केला. त्यानंतर काठीने डाव्या हातावर मारहाण करून जांभुळकर यांना जखमी केले. त्यानंतर काठीचा धाक दाखवून त्यांना घरी घेऊन गेला.
घराची बंद पडलेली लाईट या कर्मचाऱ्याकडून दुरुस्त करून घेतली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कोंडीभाऊ वालकोळी तपास करत आहेत.