थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलच्या कारभाराची सखोल चौकशी करा: खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 08:16 PM2021-05-22T20:16:15+5:302021-05-22T20:16:41+5:30

मुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

MP Shrirang Barne's demand to CM, Union Health Minister to deeply investigate the management of Birla Hospital | थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलच्या कारभाराची सखोल चौकशी करा: खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलच्या कारभाराची सखोल चौकशी करा: खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

googlenewsNext

पिंपरी : थेरगाव येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांकडून अवास्तव बिलांची आकारणी केली जाते. विमा धारक रुग्णांकडून अवाजवी बिल आकारणी केली जाते.  शासकीय योजनांचा रुग्णांला लाभ दिला जात नाही. बिलाचे पैसे न दिल्यास मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिला जातो. हॉस्पिटल प्रशासन नातेवाईकांना उद्धटपणे वागणूक देते. बिर्लामध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. या  हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी येत आहे. त्यामुळे हॉस्पिटलच्या कारभाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन, राष्ट्रीय चिकित्सक संघाचे अध्यक्ष डॉ. जे.ए.जयलाल यांना पत्र पाठविले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत देखील बिर्ला हॉस्पिटलकडून अवास्तव बील आकारणी केली जात असल्याची तक्रार केली. हॉस्पिटलकडून नाहक रुग्णांना त्रास दिला जातो. त्याची चौकशी करण्याची मागणीही बारणे यांनी केली.

बारणे म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रात थेरगाव येथे पाचशे बेडचे आदित्य बिर्ला मेमोरीयल हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांकडून वाढीव बिले आकारली जातात. त्याचबरोबर आगाऊ व पैसे वेळेवर भरले नाही  तर रुग्णांचा उपचार तत्काळ थांबवला जातो. यामुळे रुग्ण दगावले जातात. नातेवाईकांबरोबर अरेरावीची भाषा वापरली जाते.  हॉस्पिटमध्ये डॉक्टर, कर्मचाऱ्याांची संख्या बेडच्या तुलनेने कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने अनेक रुग्ण दगावले आहेत. कोरोना काळात या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत चारशेच्या जवळपास रुग्ण दगावले आहेत. या हॉस्पिटल विषयी अनेक तक्रारी आहेत.  एखादा रुग्णाचा मृत्यू झाल्यास पूर्ण पैसे जमा केले जात नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात दिला जात नाही. अनेक दिवस हॉस्पिटलमध्येच मृतदेह ठेवला जातो. सरकारी योजनांचाही लाभ रुग्णांना मिळत नाही. कमी उत्पन्न गटातील राखीव बेड रुग्णांना दिले जात नाहीत. याबाबत नातेवाईक सातत्याने तक्रारी करत आहेत. सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, सैनिक यांच्यासाठी राखीव बेड असताना दाखल करताना बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. तसेच त्यांना बाहेर ताटकळत ठेवले जाते. हॉस्पिटलच्या एकूणच कारभाराविषयी सखोल चौकशी करण्यात यावी. गेल्या वर्षभरात  झालेल्या मृत्यूंची  चौकशी करावी.’’

Web Title: MP Shrirang Barne's demand to CM, Union Health Minister to deeply investigate the management of Birla Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.