५०० पेक्षा जास्त रहिवासी हवा प्रदूषणविरोधात रस्त्यावर; वाकड-ताथवडेतील सोसायटीधाकरांचा मूक मोर्चा
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: March 8, 2025 17:08 IST2025-03-08T17:07:33+5:302025-03-08T17:08:38+5:30
वाकड ताथवडे परिसरात सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत

५०० पेक्षा जास्त रहिवासी हवा प्रदूषणविरोधात रस्त्यावर; वाकड-ताथवडेतील सोसायटीधाकरांचा मूक मोर्चा
पिंपरी : वाकड-ताथवडे परिसरातील २२ हून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांचे ५०० पेक्षा जास्त रहिवासी शनिवारी (दि.०८) “हवा प्रदूषण विरोधात एकत्र आले. मूक मोर्चा काढून नागरिकांनी सिमेंट मिक्स धुळ आणि बांधकामाच्या धुळीमुळे वाढलेल्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले. प्रदूषणाच्या विरोधात आवाज उठवत स्वच्छ व निरोगी पर्यावरण आमचा हक्क असून त्याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे अशी ही मागणी नागरिकांनी केली.
वाकड-ताथवडे हौसिंग सोसायटीज फोरम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कोहिनूर कोर्टयार्ड वन सोसायटी पासून इंदिरा स्कूल मार्गे वाकडकर चौकापर्यंत नेण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी मूक मोर्चा द्वारे पर्यावरण, प्रदूषण, नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत आहेत असा मुद्दा यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.
हवेची गुणवत्ता दररोज घसरत असल्यामुळे परिसरातील लहान मुले, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये दम्याचे, अॅलर्जीचे आणि श्वसनासंबंधी आजारांचे प्रमाण वाढत आहे. याकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे, प्रदूषण वाढल्याने नैसर्गिक जीवनमानावर परिणाम दिसून येत आहे. सिमेंटच्या धुळीचा थर रस्त्यांवर, गाड्यांवर आणि घरांवर साचत असून नागरिकांचे जीवनमान ढासळत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या...
- सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद व्हावी.
- वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना लागू कराव्यात.
- वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा.
- रस्त्यांची नियमित २ वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे.
- नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई केली जावी.
- स्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे, एअर गन द्वारे नियमितपणे पाण्याचा फवारा मारला जावा.
- प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक ती आरोग्यसेवा पुरवावी.
- रस्त्यांवरील झाडांची देखभाल आणि पाणी नियमित करावे.