कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 18:58 IST2018-11-05T18:48:02+5:302018-11-05T18:58:49+5:30
कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले.

कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे अपहरण
पिंपरी : कुटुंबियांच्या विरोधाला न जुमानता प्रेमविवाह केलेल्या विवाहितेचे मोरवाडी, पिंपरी येथून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अपहरण करण्यात आले. या प्रकरणी पती रवि वसंत वावरे यांनी अपहरकर्त्यांविरूद्ध पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पाचपैकी एकाही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेचा भाऊ महेश विष्णू लवटे (वय २२,रा.पनवेल, जिल्हा रायगड) याने त्याच्या तीन चार साथीदारांच्या मदतीने जबरदस्तीने विवाहितेला मोटारीत बसवुन पळवुन नेले. मोरवाडी, मोरजाई मंदिराजवळील सुखवाणी एम्पेरिअर या सोसायटीत राहणाऱ्या रवि वसंत वावरे यांनी पत्नीचे अपहरण केल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. विवाहितेचे अपहरण करणारा आरोपी लवटे हा मुळचा कडलस, ता. सांगोला, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी आहे. त्याच्या बहिणीने मोरवाडी, पिंपरी येथे राहणाऱ्या वावरे याच्याबरोबर प्रेमविवाह केला. बहिणीने वावरे याच्याबरोबर प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आरोपी साथीदारांना घेऊन रविवारी पिंपरी येथे आला. एम एच ११, बीडी ५७९३ या मोटारीतून आरोपीने साथीदारांच्या मदतीने विवाहितेचे अपहरण केले. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.