लग्न, अनैतिक संबंध, अन् कर्ज...; नकुल भोईर खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरासही अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:37 IST2025-10-30T15:36:55+5:302025-10-30T15:37:10+5:30
दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

लग्न, अनैतिक संबंध, अन् कर्ज...; नकुल भोईर खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरासही अटक
पिंपरी : चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या खुनात पत्नी चैतालीसह तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून बुधवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने चैताली आणि दीपक या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दि. २४ ऑक्टोबरला पहाटे पावणेतीनच्या सुमारास नकुल आनंदा भोईर (४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून केल्याची माहिती पत्नी चैतालीने स्वतःच पोलिसांना फोन करून दिली होती. चिंचवड येथील माणिक कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राजवळ ही घटना घडली होती. पोलिसांनी चैतालीला अटक केली होती. मात्र, यात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र, दोघेही उडवाउडवीची उत्तरे देत होते.
सिद्धार्थ-चैतालीच्या प्रेमसंबंधावरून नकुलशी वाद होत असत. प्रेमसंबंधाच्या आड येत असल्याने दोघांनी नकुलचा काटा काढण्याचे ठरविले. त्यातच चैतालीने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहितीही नकुल यांना समजली. त्यावरून भांडण झाले. यावेळी नकुलने तिला मारहाण केली. तिला मारहाण झाल्याने सिद्धार्थचा राग अनावर झाला. दोघांनी संगनमताने ओढणीने नकुलचा गळा आवळून खून केला.
पोलिसांना ओढणी लपवून दुसरीच दाखवण्याचा प्रकार
चैतालीने आपणच नकुलचा गळा आवळला असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र तपासात दोघांनी खून केल्याचे निष्पन्न झाले. ज्या ओढणीने नकुल यांचा गळा आवळला, ती ओढणी सिद्धार्थ जाळून टाकणार होता. कारण तिला नकुलच्या घामाचा वास होता. त्यामुळे चैतालीने दुसरीच ओढणी पोलिसांना दाखविली. ज्या ओढणीने खून केला, ती जप्त करण्यासाठी चैतालीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले.